अतिक्रमण पाडायला आल्याने चिपळूणच्या माजी नगरसेवकाची आत्महत्येची धमकी

0

चिपळूण : अतिक्रमणविरोधी पथक पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यासाठी आल्याने चिपळूणच्या माजी नगरसेवकाने मंगळवारी आत्महत्येची धमकी दिली. पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात कारवाई थांबविली. चिपळूण शहरातील शिवनदीजवळ एक चहाच्या दुकानाचे नुकतेच नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे आणि माजी आमदार रमेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. लागलीच दुसऱ्या दिवशी पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक पोलीस बंदोबस्तात हे दुकान तोडण्यासाठी गेले. त्यावर कारवाई होऊ नये म्हणून दुकानमालक दुकानाच्या पत्र्यावर चढला. आत्महत्या करण्याची धमकी दिली. चिपळूणचे माजी नगरसेवक रमेश खळे यांनी ही धमकी प्रशासन आणि पोलिसांना दिली. खळे शिवनदीलगत हातगाडीवर वडापाव विक्रीचा व्यवसाय करायचे. तेथे त्यांनी पत्र्याची कायमस्वरूपी शेड उभारून चहाच्या व्यवसायाला सुरवात केली. आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे आदींच्या उपस्थितीत नव्या व्यवसायाचे काल उद्घाटन झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक कारवाईसाठी गेल्यामुळे खळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि कारवाई टाळण्यासाठी ते दुकानाच्या छपरावर चढले. शहराला वीजपुरवठा करणारी ३३ केव्हीची विद्युतवाहिनी जवळूनच जात असल्याने प्रशासनाने विद्युतपुरवठा बंद करण्याची सूचना महावितरण कंपनीला केली. त्यामुळे दुकानदारांची गैरसोय झाली. अखेर अर्ध्या तासाने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक शहराच्या अन्य भागात निघून गेले. आपले दुकान खासगी जागेत असून जागामालकाला मी नियमित भाडे देत आहे. त्यामुळे पालिकेने कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे खळे यांनी सांगितले. पालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे म्हणाले की, खळे यांनी शिवनदीच्या संरक्षक कठड्यावरच पत्र्याचे बांधकाम केले आहे. आधी तेथे वडापाव विकण्याचा व्यवसाय होता. मात्र आता पक्के बांधकाम केल्याने त्यावर कारवाई करण्याचे पाऊल पालिकेने उचलले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:45 PM 18-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here