कोकणाची मुख्यमंत्री निधीकडून उपेक्षा कायम : आ. निरंजन डावखरे

0

ठाणे : कोरोना आपत्तीच्या काळात पंतप्रधान सहायता निधीकडून कोकणातील पाच जिल्हा रुग्णालयांना २७९ व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री निधीकडून रुग्णालयांना काहीही मदत देण्यात आली नाही. केवळ रत्नागिरी येथील कोरोना आरटीपीसीआर लॅबसाठी दिलेले १ कोटी ७ लाख रुपये वगळता मुख्यमंत्री निधीकडून कोकणाला ठेंगा दाखवून उपेक्षा करण्यात आली, याकडे भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले आहे.

कोरोना आपत्तीच्या काळात पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीकडून कोकणातील पाच जिल्ह्यात कोणती मदत व साहित्य पुरविण्यात आले, याबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून माहिती मागविली होती. त्यानुसार कोकणातील पाच जिल्ह्यात पंतप्रधान सहायता निधीतून २७९ व्हेंटिलेटर, २६५ जम्बो सिलिंडर आणि ३७१ थ्री टाईप सिलिंडर पुरविण्यात आले. तर मुख्यमंत्री सहायता निधीकडून रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना चाचणीसाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी १ कोटी ७ लाख रुपयांचा निधी देण्यात आला, अशी माहिती संबंधित शल्यचिकित्सकांकडून पत्राद्वारे देण्यात आली आहे. पंतप्रधान सहायता निधीतून ठाणे जिल्हा शासकिय रुग्णालयाला ४६, पालघरमध्ये ४४, रत्नागिरीत ४४, सिंधुदुर्गात ४७ आणि रायगडमध्ये ९८ व्हेंटिलेंटर पुरविण्यात आले. रायगड जिल्हा शासकिय रुग्णालयाला व्हेंटिलेटरबरोबरच २६५ जम्बो सिलिंडर व ३७१ थ्री टाईप सिलिंडर पुरविण्यात आले. तर मुख्यमंत्री सहायता निधीतून केवळ रत्नागिरी जिल्ह्याला कोरोना चाचणी लॅबसाठी निधी दिला गेला. उर्वरित जिल्हा रुग्णालयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक रुपयाही मिळालेला नाही, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले आहे. ठाणे जिल्ह्यासह कोकणातील जिल्हा रुग्णालयांकडे राज्य सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. किमान कोरोना आपत्तीत जिल्हा रुग्णालयांना भरीव मदतीची अपेक्षा होती. मुख्यमंत्री सहायता निधीत कोट्यवधी रुपयांचा निधी जमा झाला असतानाही कोकणाची उपेक्षा करण्यात आली. महाविकास आघाडीकडून कोकणाकडे सातत्याने दुर्लक्ष जात असून, आताही कोकणाला ठेंगा दाखविण्यात आला, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:07 PM 18-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here