एलईडी मासेमारी विरोधात कायमस्वरूपी बंदीसाठी मंत्रालय स्तरावर मसुदा तयार

0

दापोली : एलईडी मासेमारी बंदीसंदर्भात अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे. मंत्रालयात शुक्रवारी पर्यावरणमंत्री रामदास कदम, मत्स्य आयुक्‍त राजीव जाधव, अनुपकुमार, मच्छीमार प्रतिनिधी पी. एन. चोगले आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. लवकरच या मसुद्याचे अध्यादेशात रुपांतर केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एलईडीद्वारे होणार्‍या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार व्यवसाय अडचणीत आला आहे. या संदर्भात तालुक्यातील हर्णै, दाभोळ, गुहागर येथील पारंपरिक मच्छीमार आक्रमक झाले होते. एलईडीविरोधात संघर्षाचा एल्गार पुकारण्यात आला. यानंतर शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या प्रकरणी लक्ष घातले. त्यांनी हा विषय मार्गी लागण्यासाठी मच्छीमार बांधवांसमवेत भाजपचे राजनाथ सिंह व माजी संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांची भेट घेतली होती. यानंतर लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने हा विषय लांबणीवर पडला होता. पावसाळा दरम्यान दि. 1 जून ते 31 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी होती. त्यामुळे एलईडी मासेमारीही बंद होती. एलईडी मासेमारीवर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत दंड आणि शिक्षेच्या अध्यादेशाला अंतिम स्वरूप देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. एलईडीद्वारे होणार्‍या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्‍वासने न देता मच्छीमारांना न्याय मिळेपर्यंत आपले प्रयत्न सुरूच राहतील, असे ना. कदम यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here