चिपळूण : वादग्रस्त 370 कलम हटवून काश्मीर मुक्त केले. आता लक्ष्य राम मंदिर उभारणी व पाकव्याप्त काश्मीर मुक्तीकडे आहे. राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन करायचे आणि मुख्यमंत्री बनवायचा हे स्वप्न नाही, तर नव महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवशाही आणण्याचे स्वप्न आहे. त्याकरिता शिवबंधनातील हातांची एकजूट होण्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले. चिपळुणातील सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणात रविवारी (दि. 15) दुपारी आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे आगमन झाले. यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर, म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ. सदानंद चव्हाण, सुनील शिंदे, जि.प. अध्यक्षा स्वरूपा साळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम, शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, सचिन अहिर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले, 370 कलम हटवून काश्मीर मुक्त झाले आहे. आता पाकव्याप्त काश्मीर मुक्त करावयाचेआहे. तसेच राम मंदिर उभारायचे आहे. राम मंदिराचा विषय सर्वप्रथम शिवसेनेने हाती घेतला. कोकणातील जनतेने शिवसेनेला भरभरून प्रेम व साथ दिली आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत जाण्याचे नियोजन आहे. ज्यावेळी राज्यात 1995 मध्ये युती शासन आले त्यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे हे याच चिपळूणच्या भूमीत जाहीर सभेत व्यासपीठावर कोकणवासीयांसमोर नतमस्तक झाले. त्यामुळे चिपळूण आणि ठाकरे कुटुंबियांचे हे वेगळे नाते आहे. ज्यावेळी मी चिपळूणला पहिला दौरा केला त्यावेळी स्पर्धा सुरू होत्या. त्यावेळी मिळालेले प्रेम आजच्या दौर्यातही दिसून येत आहे. माझी यात्रा राजकीय प्रचारासाठी नाही. शिवसेनेच्या भरघोस मतांनी विजयाची सुरुवात चिपळुणातूनच होणार आहे. मी चिपळूणला प्रचारासाठी येणार नाही. मात्र, विजयी मेळाव्यासाठी येणार आहे. जनता हा सर्वात मोठा देव आहे. त्याचे आशीर्वाद व प्रेम महत्त्वाचे आहे. नव महाराष्ट्र घडविताना शिवबंधनातील हातांची एकजूट बळकट व्हावी हा या यात्रेमागील हेतू आहे. हार-तुरे देणार्या हातांपेक्षा निवेदन देणार्या हातांमागचे प्रेम, विश्वासाची भावना माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. जाती, धर्म, समाजातील द्वेषापलिकडे शिवशाहीचे राज्य स्थापन करून नव महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न आहे.
