कुडाळ : लिप्टचा बहाणा करून कणकवलीच्या दिशेने येणार्या एका सुमो गाडीत प्रवेश मिळवत महामार्गावर वेताळबांबर्डे येथे त्या सुमोचालकाचे तीन अज्ञात इसमांनी गाडीसह अपहरण केले. त्यानंतर या सुमोचालकाला त्यांनी बेदम मारहाण करीत त्याच्याकडील सुमो गाडीसह रोख रक्कम लुटून पोबारा केला. एखाद्या चित्रपटला शोभेशी ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री 10.45 वा.च्या सुमारास घडली. यात सुमोचालक जखमी झाला आहे. या थरारक घटनेने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कणकवली येथील रमेश आनंद आजवेलकर हे कणकवलीतील एका सुमोवर चालक म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी ते गोवा-कलंगुट येथे प्रवासी सोडण्यासाठी गेले होते. रात्री ते सुमो घेऊन कणकवलीकडे परतत असताना पत्रादेवी येथे तीन युवकांनी सुमोला हात दाखवून थांबविले. त्यांनी आपल्याला तळेरे येथे जायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी सुमो चालक आजवेलकर यांनी आपण कणकवलीपर्यंत सोडतो, असे सांगत तिन्ही अज्ञातांना सुमोत घेतले. सुमो झाराप येथे आल्यावर या तिघांनी एका स्टॉलवर उतरून तंबाखू पुडी खरेदी केली. दरम्यान, या तिघांच्याही वर्तणुकीचा संशय आल्याने आजवेलकर यांनी त्यांना कुडाळ येथे उतरण्यास सांगितले. मात्र, त्यांनी गयावया करत किमान कसालपर्यंत तरी सोडा, असे सांगितले. आजवेलकर यांनी त्यांची विनवणी मान्य करत गाडी पुढे मार्गस्थ केली. दरम्यान, सुमो वेताळबांबर्डे गावाजवळ आली असता एकाने आपल्याला उलटी होत असून, गाडी चालकाला थांबविण्यास सांगितले. चालकाने गाडी थांबवताच मधील सीटवर बसलेल्या तरुण खाली उतरुन चालकाच्या बाजुचा दरवाजा उघडला व श्री. आजवेलकर यांना खेचून गाडी बाहेर काढले. त्या नंतर अन्य दोघांनी पकडून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना गाडीच्या मधील सीटवर ओढून घेत ओरडल्यास ठार मारून टाकू अशी धमकी दिली. यावेळी त्यांच्याकडील 4 हजार रुपये त्यांनी काढून घेतले. तसच मोबाईल काढून घेत तो स्वीच ऑफ केला. त्यानंतर चालकाला मागील सीटवर बसवून एकाने सुमो पुन्हा मागे फिरवून दाणोलीमार्गे आंबोलीच्या दिशेने वेगात पळवत नेली. यावेळी दोघांनी त्याचे हात व तोंड दाबून धरले होतेे. श्री. आजवेलकर यांना गाडीतील आरसा व केबलने माराहाण केल्याने त्यांच्या डोकीतून रक्तस्त्राव झाला. या भामट्यांनी सुमो वेंगुर्ले- बेळगाव मार्गावर दाणोली परिसरात काहीशी हळू केली. त्यांनी आजवेलकर यांना पुन्हा मारहान करण्यासाठी गाडीत असलेला मोटर सायकल शॉकॉब्सर बाहेर काढला. मात्र प्रसंगावधान राखत आजवेलकर यांनी गाडीच्या मागील हौद्यात झोकून देत सुमोचा मागील दरवाजा उघडून चालत्या गाडीतून उडी मारली व रस्त्यालगतच्या झाडीत दडी मारली. त्यानंतर तीनही अज्ञात इसमांनी सुमो गाडी घेऊन पलायन केले. भामटे दूर गेल्याची खात्री झाल्या नंतर श्री. आजवेलकर यांनी कशीबशी दाणोली बाजारपेठे गाठली व तेथील ग्रामस्थांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांची पेट्रोलिंग गाडी तेथे दाखल होताच त्यांनी घडलेली घटना पोलिसांनी सांगितली व त्यानंतर सावंतवाडी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. ही घटना वेताळबांबर्डे येथे घडल्याने सावंतवाडी पोलिस ठाण्यातून ती कुडाळ पोलिस ठाण्यात फिर्याद वर्ग करण्यात आली. याप्रकरणी अज्ञातांविरोधात शिविगाळ, मारहाण, अपहरणसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी सहकार्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या लुटारूंच्या शोधासाठी पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह कुडाळ पोलिस या लुटारूचा शोध घेत आहेत. महामार्गावरील बांदा, झाराप येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार असून चोरून नेलेल्या मोबाईलद्वारे चोरट्यांचे लोकेशन तपासण्यात येणार असल्याचे कुडाळ पोलिसांनी सांगितले. याबाबतचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे करीत आहेत.
