सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर कोकणातील पत्रकारांना सरसकट टोलमुक्ती द्यावी, यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडे केली. पत्रकारांना पेन्शन देण्याबाबत लावलेल्या जाचक अटी दूर करून जास्तीत जास्त पत्रकारांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गजानन नाईक यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री दीपक केसरकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, विश्वस्त किरण नाईक, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, भोसले नॉलेज सिटीचे अच्युत भोसले, सतीश लळीत, वसंत उर्फ अण्णा केसरकर, लायन्स क्लबचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष रवी सावंत, संतोष वायंगणकर, भगवान लोके, रमेश जोगळे, उज्वल नारकर, जिल्हा सरचिटणीस उमेश तोरसकर, जिल्हा सदस्य हरिश्चंद्र पवार, जिल्हा खजिनदार संतोष सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय देसाई, प्रफुल्ल देसाई, नंदकिशोर महाजन आदींसह जिल्हाभरातील पत्रकार उपस्थित होते.
