खेड : सत्ता असो वा नसो जनतेची सेवा करण्यासाठी ही यात्रा आहे. जो शिवसैनिक शाखेच्या माध्यमातून समाजातील लोकांची 365 दिवस सेवा करत आहे त्यांना सलाम करण्यासाठी मी आलो आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले. रविवार दि 15 रोजी खेड शहरातील एसटी मैदानात आयोजित विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे दहा हजारापेक्षा जास्त शिवसैनिक दापोली विधानसभा मतदारसंघातून उपस्थित होते. आदित्य ठाकरे जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मेळाव्यात पोहोचले. यावेळेस त्यांच्या सोबत शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर, सचिन अहीर, केशवराव भोसले, दुर्गा भोसले-शिंदे, योगेश कदम, सिद्धेश कदम, जिल्हाप्रमुख सचिन कदम, संदीप राजपुरे, अरुण कदम, आदेश केणी यांच्यासह खेड, दापोली व मंडणगड शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी योगेश कदम यांनी मनोगत व्यक्त करताना दापोली विधानसभा मतदार संघात भगवा फडकणारच असा विश्वास व्यक्त केला. ना.रामदास कदम म्हणाले, या यात्रा कशी असावी हे आदित्य यांनी दाखवून दिले आहे. यात्रेत त्यांना लोकांकडून जो पाठिंबा मिळत आहे ते विरोधकांना घाम फोडणारे आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत खेड, दापोली व मंडणगड येथील शेकडो कार्यकर्त्यांसह खेडमधील राष्ट्रवादीचे सिकंदर जसनाईक व काँग्रेसचे सदानंद भोसले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या मेळाव्यात श्री. ठाकरे म्हणाले, नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी युवकांना सगळ्यांना सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. शिवसेनेसाठी निवडणूक हे केवळ माध्यम आहे. खरेतर शिवसैनिक 365 दिवस शाखेच्या माध्यमातून जनसेवा करीत असतो. त्या शिवसैनिकांना भेटून सलाम करण्यासाठी मी या यात्रेद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. योगेश कदम यांनी दापोली विधानसभा मतदार संघात लक्षणीय काम केले आहे. त्यांच्यासारखे युवक मिळाले तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात भगवा फडकायला वेळ लागणार नाही. मी यात्रा व मेळाव्याद्वारे मत मागायला आलेलो नाही. शिवसेनेच्या माध्यमातून शिवशाही खर्या अर्थाने कसे काम होते हे सांगण्यासाठी व तसेच काम पुढे चालू ठेवण्यासाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे ते म्हणाले.
