काँक्रिटीकरण केलेल्या नवीन महामार्गावर खड्डे पडण्यास सुरूवात

0

कुडाळ : चौपदरीकरणाअंतर्गत काँक्रिटीकरण केलेल्या नवीन महामार्गावर खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. साळगाव बॉक्सवेलजवळ कुडाळच्या दिशेने जाणार्‍या लेनवर सुमारे अर्धा फुटाचा खड्डा तयार झाला आहे. वर्षभरातच अशा प्रकारचे खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने कामाच्या दर्जाहीनतेबाबत वाहनधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाअंतर्गत झाराप ते कुडाळ भागात काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र या काँक्रीटीकरणाचे काम दर्जाहीन असल्याने वर्षभरातच उघड झाले आहे. महामार्गावर तेर्सेबांबर्डेसह अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणाला आडवे तडे गेल्याचे प्रकार गेल्या वर्षभरात घडले आहेत. साळगांव बॉक्सवेल येथीलही एका छोट्या पुलाला उभे तडे गेले आहेत. यानंतर आता काँक्रिटीकरण केलेल्या भागावर खड्डेच पडण्यास सुरूवात झाली आहे. साळगाव येथील बॉक्सवेलवर कुडाळच्या दिशेने जाणार्‍या लेनवर सुरूवातीला  एका छोट्या आकाराचा खड्डा तयार झाला आहे. हा खड्डा सुमारे अर्धा फुटाचा आहे. मात्र सुरूवातीला हे खड्डे लहान आकाराचे असले तरी ते काही दिवसांनी वाढत जातात. नवीन महामार्गावर अशा प्रकारचे खड्डे पडण्यास सुरूवात झाल्याने या कामाची दर्जाहीनता स्पष्ट होत आहे. बिबवणे येथेही बॉक्सवेल जवळील काँक्रिटीकरण केलेल्या भागात काँक्रीटीकरणाचे अनेक तुकडे उडाले आहेत. सर्वसामान्यतः  काँक्रिटीकरणाला किमान तीन वर्षे काही होत नाही. मात्र 100 वर्षाची हमी असलेल्या चौपदरी महामार्गावर वर्षभराच्या आतच खड्डे पडू लागल्याने महामार्गाच्या दर्जाबाबत शंका निर्माण होत आहे.  या महामार्गाच्या सर्वच कामाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची मागणी वाहनधारकांमधून करण्यात येत आहे. महामार्ग चौपदरीकरण काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराने ओढुन ताणून कसे तरी काम पूर्ण करण्याचा लावलेला सपाटा भविष्यात वाहनधारकांसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.  याबाबत स्थानिक व वाहनधारकांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत असून नादुरूस्त झालेल्या या काँक्रिटीकरणाच्या भागाची त्वरित डागडुजी करण्याची मागणीही करण्यात येत आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here