सावंतवाडी : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा सांगणारी पत्रकारिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोपासली जात आहे याचा अभिमान वाटतो, असे प्रतिपादन करत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. मराठी पत्रकार परिषदेचे नूतन अध्यक्ष गजानन नाईक यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, नगराध्यक्ष बबन साळगावकर, शरद बाबळे, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, माजी माहिती उपसंचालक सतीश लळीत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, सरचिटणीस उमेश तोरसकर, खजिनदार संतोष सावंत, कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र पवार, देवयानी वरसकर, रमेश जोगळे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष विजय देसाई, सचिव अमोल टेंबकर, भगवान लोके आदी उपस्थित होते. ना. केसरकर म्हणाले, गजानन नाईक यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत पत्रकार म्हणून काम केले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक जिल्ह्यात व्हावे म्हणून गजानन नाईक यांच्यासह सहकार्यांनी केलेला पाठपुरावा मोलाचा आहे. महाराष्ट्राला आदर्श ठरेल असे स्मारक उभारले जात असल्याचे ते म्हणाले. पत्रकारांच्या चांगल्या गुणांचा हा सत्कार आहे. जिल्ह्यातील पत्रकार आमिषाला बळी पडत नाहीत त्याचा मला अभिमान वाटतो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारितेची ही परंपरा आता सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनीही जोपासावी असे आवाहन केले. पत्रकार पेन्शन योजना सर्व पत्रकारांना लागू व्हावी तसेच वसंत केसरकर यांना पत्रकार पेन्शन योजना लागू करावी म्हणून आपला प्रयत्न राहील. मुख्यमंत्र्यांना भेटून पत्रकार संरक्षण कायद्याची लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही ना.केसरकर यांनी दिली. नगराध्यक्ष बबन साळगावकर, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख, यशवंतराव भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, जिल्हा अध्यक्ष गणेश जेठे, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी उपसंचालक सतीश लळीत, मधुसूदन नानिवडेकर आदींनी गजानन नाईक यांना शुभेच्छा दिल्या. मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष झाल्याबद्दल गजानन नाईक यांचा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पालकमंत्री दीपक केसरकर, एस. एम. देशमुख, शरद बाबळे, सुभाष तोरसकर, मिलिंद बांदिवडेकर, नगराध्यक्ष साळगावकर यांचाही सत्कार करण्यात आला. शेतकर्यांप्रमाणे पत्रकारांना केवळ झुलवत ठेवण्याचे काम विद्यमान शासनाने केले असा आरोप मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केला. पत्रकारांच्या प्रश्नासाठी प्रसंगी संघर्ष करण्याची आमची तयारी आहे, असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, सद्यस्थितीत शासनाने केवळ पत्रकारांना झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. पत्रकारांसाठी पेन्शन योजना जाहीर करण्यात आली. त्यासाठी 230 पत्रकार यांची निवड करण्यात आली. परंतू अंतिम यादीत फक्त 20 पत्रकारांची निवड करण्यात आली. ही पेन्शन योजना दिखाऊ आहे. पत्रकार हल्ला विरोधी कायदा तसाच पडून आहे. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे येणार्या काळात याबाबत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे, असा इशारा त्यांनी दिला. यावर पत्रकार हल्ला विरोधी कायदा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे ना. केसरकर म्हणाले. नाईक सत्काराला उत्तर देताना म्हणाले, अत्यंत कठीण परिस्थितीत पत्रकारीता सुरू केली. आज मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळाल्याने मोठे समाधान आहे. या पदाच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम निश्चितच करेन. लायन्स क्लबचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष रवी सावंत, महेश पाटील व जिल्ह्यातील पत्रकार उपस्थितीत होते.
