नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन भारतीयांना 22 सप्टेंबरला ह्युस्टन येथे होणाऱ्या कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला जवळपास 50 हजार लोक उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित राहणार आहेत. इतिहासात पहिल्यादाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हजारो अमेरिकन भारतीयांना एकाचवेळी संबोधित करणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. रविवारी व्हाईट हाऊसने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हाऊडे मोदी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यानंतर अमेरिकेतील उच्चायुक्त हर्षवर्धन श्रींगला यांनी ‘दोन्ही देशाचे प्रमुख हाऊडे मोदी कार्यक्रमात जनसमुदायाला संबोधित करणार आहेत ही ऐतिहासिक आणि अनपेक्षित घटना आहे. हे फक्त या दोघा नेत्यांमधील जवळीक आणि सहजता दर्शवत नाही तर मोदी आणि ट्रम्प या दोघांमधील वैयक्तिक केमिस्ट्री आणि मित्रता याचीही प्रचिती येते.’ असे सांगितले. व्हाईट हाऊसने ‘या कार्यक्रमाद्नारे भारतातील आणि अमेरिकेतील लोकांमधील बंध घट्ट करण्याची ही एक उत्तम संधी आहे. यामुळे जगातील सर्वात जुनी आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही यांच्यातील भागिदारी अधिक वृद्धिंगत होईल. तसेच याचा व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातील या दोन देशांमधील नाते कसे घट्ट करता येईल याच्यावरही चर्चा करण्यास मदत होईल.’ असे वक्तव्य प्रसिद्ध केले होते. या कार्यक्रमाला जवळपास 60 लॉ मेकर उपस्थित राहणार आहेत. यात अमेरिकेच्या पहिल्या हिंदू काँग्रेसमन तुलसी गबार्ड आणि भारतीय अमेरिकन काँग्रेसमन राजा कृष्णमूर्ती हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाची थीम स्वप्ने वाटून घेणे आणि उज्वल भविष्य अशी आहे. सात दशकापासून भारतीय अमेरिकन लोकांनी अमेरिकेच्या वृद्धीत कशी महत्वाची भुमिका पार पाडली आहे. तसेच त्यांनी दोन देशातील नाते घट्ट करण्यात महत्वाची भुमिका पार पाडली आहे. या कार्यक्रमात हे अधोरेखित केले जाईल. विशेष म्हणजे 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेतल्या भारतीय अमेरिकन लोकांपैकी 84 टक्के लोकांनी ट्रम्प यांच्या विरोधात उभ्या असलेल्या हिलरी क्लिंटन यांना मतदान केल्याची माहिती एएफपी या वृत्त संस्थेने दिली होती.
