रत्नागिरी : दि. १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दोन आठवड्यांमध्ये कोकण रेल्वेतर्फे स्वच्छता पंधरवडा पाळण्यात येणार आहे. या निमित्त प्रभात फेरी, जनजागृती करण्यासाठी सेमिनार व कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा, विभागांतर्गत स्वच्छता स्पर्धा, निरनिराळ्या सामाजिक संस्थांचा जनजागृतीच्या हेतूने सहभाग आदी कार्यकामांचे कोकण रेल्वेतर्फे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSS व कोकण रेल्वेचा कर्मचारी वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण खेड रत्नागिरी या तीन स्टेशन्सवर पथनाट्याचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येत आहेत. प्लास्टिक मुक्तीचा एक भाग व जनजागृती या हेतुने प्लास्टिकला उपलब्ध असलेले पर्याय व त्यापासून बनवलेल्या वस्तू यांचे एक छोटेखानी प्रदर्शन देखील निराळ्या स्टेशनवर या कालावधीत भरवण्यात येईल प्लास्टिक मुक्तीसाठी एक निर्णायक पाऊल म्हणून २ ऑक्टोबरपासून सर्व रेल्वेस्टेशन्सवर केवळ एकदाच वापरल्या जाणाऱ्या व पुनर्प्रक्रिया न करता येऊ शकणाऱ्या प्लॅस्टिकच्या अनेक उत्पादनांवर बंदी देखील येऊ शकते व त्यादृष्टीने विचारविमर्श चालू आहे. प्लास्टिक मक्ती ही प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी कोकण रेल्वेतर्फे सर्व स्टेशनवरील स्टॉलधारक, कॅन्टीन चालक व फिरते विक्रेते यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहयोगाने हे उपक्रम राबवण्यात येतील. या दोन आठवड्यांच्या अभियानांतर्गत व नंतर देखील, रत्नागिरीतील अग्रणी सामाजिक संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे.
