रत्नागिरी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत भाजपची महाजनादेश यात्रा घेऊन येत आहेत. त्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर भव्य मंडप उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. या कामाची व त्या अनुषंगाने रस्ते, वीज आदीसंदर्भात आढावा भाजप उपाध्यक्ष तथा आ. प्रसाद लाड यांनी आज सकाळी घेतला. या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारीगणेश इंगळे, वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल विभुते, नगरपालिका, महावितरण, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, स्वागताध्यक्ष अॅड. विलास पाटणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिन वहाळकर, शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर, नगरसेवक उमेश कुळकर्णी, अण्णा करमरकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजू मयेकर आदी उपस्थित होते. राजापूरमधून आडिवरे, पावसमार्गे यात्रा रत्नागिरीत दाखल होणार आहे. या मार्गावर कोणताही अडथळा होता कामा नये, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, वाहतूक कोंडी होऊ नये, आवश्यक त्या ठिकाणी पोलिस व वाहतूक पोलिस, होमगार्ड आदींबाबत आ. प्रसाद लाड यांनी सूचना दिल्या. मंडपाचे काम वेगाने सुरू असून, लवकरच फोल्डिंगचामंडप पूर्ण होणार आहे. यामध्ये २० बाय ६० फुटाचे व्यासपीठ उभारले जाणार आहे. या परिसरातील गवत काढणे, स्वच्छता तसेच मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. याचा आढावासुद्धा घेण्यात आला. कार्यकर्त्यांना मात्र मुख्यमंत्री काय बोलणार, कुणाची पोलखोल करणार, याचे वेध लागले आहेत.
