देवरुख : महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणुक ईव्हिएम मशिनवर न घेता ती बॅलेट पेपरवर घेण्यात यावी असे निवेदन मुख्य निवडणूक आयुक्त, केंद्रीय निवडणुक आयोगाला देण्यात आले. ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलन देवरुख केंद्रातर्फे हे निवेदन संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात यांना युयुत्सू आर्ते व सुरेंद्र माने यांनी दिले. महाराष्ट्रात राहणारे आम्ही भारतीय नागरिक असे म्हणत शंभर स्वाक्षऱ्यांचे हे निवेदन तहसीलदांकडे देण्यात आले.राज्यभरात निवेदने, मोर्चा,आंदोलने या माध्यमातुन हे जनआंदोलन उभारण्यात आले आहे. लोकांचे दोस्त या संघटनेच्या वतीने ६ जून २०१८ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांना लेखी निवेदन देउन ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, असे कळवले होते. तरीही लोकसभेच्या निवडणुका ईव्हीएम मशिनवरच घेण्यात आल्या हा लोकभावनेचा अनादर आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सविंधान दिले आहे. मतदानाचा अधिकार दिला तो या मशिनने हिरावून घेतला आहे. ही गोष्ट आम्ही भारतीय कधीही खपवून घेणार नाही, अशा भावना या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. येणारी विधानसभेची निवडणूक ही बॅलेट पेपरवच घेण्यात यावी, अशा आशयाचे हे निवेदन युयुत्सू आर्ते, सुरेंद्र माने, अंकुश खामकर यांनी तहसीलदार सुहास थोरात यांच्याकडे दिले आहे.
