नवी दिल्ली : सौदी अरेबियातील तेल उत्पादक कंपनी सौदी अराम्कोच्या तेलशुध्दीकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे कच्च्या तेलाचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाच ते सहा रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. जगातील सर्वांत मोठी तेल उत्पादक कंपनी असलेल्या सौदी अराम्को या कंपनीच्या दोन तेलशुद्धीकरण प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे कच्च्या तेलाचे उत्पादन कंपनीने निम्म्यावर आणले आहे. याच्या परिणामी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे प्रतीबॅरलचे दर ६० डॉलर्सवरून ६७ डॉलर्सपर्यंत वाढले आहेत. आखाती देशातील तणावही वाढला आहे. कच्च्या तेलाच्या दरात आगामी काळात आणखी जर वाढ झाली, तर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना पेट्रोल, डिझेल, केरोसीन, एलपीजी आणि सीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. कच्च्या तेलाच्या दराने जर ७० डॉलर्स प्रती बॅरलची पातळी ओलांडली, तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किमान पाच ते सहा रूपयांची वाढ होऊ शकते, असे इंधन क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या काही काळापासून इंधनाचे तसेच खाद्यान्न श्रेणीतील वस्तूंचे दर आवाक्यात असल्यामुळे महागाई दर नियंत्रणात आहे. तथापी पेट्रोलियम पदार्थांच्या दरात जर वेगाने वाढ झाली तर महागाई दरामध्येही वाढ होऊ शकते. थोडक्यात आगामी काळात सरकार आणि जनतेसाठी ही डोकेदुखी ठरू शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
