कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसर्या टप्प्याची सुरुवात कोकणातील सिंधुदुर्गात मंगळवारी (दि. 17) होत आहे. या यात्रेदरम्यान दु. 1.30 वा. विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर त्यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून सुमारे 10 हजार उपस्थितीच्या दृष्टीने भव्य वॉटरप्रूफ सभामंडप घालण्यात आला आहे. या सभेत मुख्यमंत्री सिंधुदुर्गच्या व कोकणच्या विकासाबाबत कोणती घोषणा करतात, याची उत्सुकता सर्व जिल्हावासीयांमध्ये आहे. तसेच राज्यात भाजप-शिवसेना युती होणार की नाही, याबाबत मुख्यमंत्री काय बोलतात याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची कणकवलीत गेल्या पाच दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेचे नियोजन करण्यात आले. या सभेच्या नियोजनाची आणि मुख्यमंत्र्यांच्या दौरा कार्यक्रमाची माहिती आ. प्रसाद लाड आणि प्रमोद जठार यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. यावेळी माजी आ. कालिदास कोळंबकर, मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर, सिध्दीविनायक न्यासाचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, भाजप नेते संदेश पारकर, अतुल रावराणे आदी यावेळी उपस्थित होते. आ. प्रसाद लाड म्हणाले, मुख्यमंत्र्यांसमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, शिक्षणमंत्री आशिष शेलार, माजी खा. किरीट सोमय्या, आ. प्रवीण दरेकर, आ. कालिदास कोळंबकर, प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंग ठाकूर, भाजयुमोचे अध्यक्ष मोहित भारती आदी व्यासपीठावर असणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्गातील महाजनादेश यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोल्हापूर-राधानगरी येथून फोंडाघाटमार्गे मुख्यमंत्र्यांचे सिंधुदुर्गात आगमन होणार आहे. फोंडाघाट ते कणकवली या दरम्यान 150 ते 200 मोटरसायकलस्वारांची रॅली काढली जाणार असून 100 ते 200 गाड्यांचा ताफा मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत असणार आहे. दु. 1.30 वा. मुख्यमंत्र्यांचे कणकवलीत सभास्थळी आगमन होणार आहे. फोंडाघाट ते कणकवली आणि रत्नागिरीकडे जाताना कणकवली ते खारेपाटण या दरम्यान सहा ठिकाणी त्यांचे स्वागत केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सभास्थळी आगमन झाल्यानंतर संदेश पारकर, अतुल रावराणे त्यांचे स्वागत करणार आहेत. या सभेचे नियोजन व अन्य व्यवस्था जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि अतुल काळसेकर यांच्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला सुमारे 12 ते 15 हजार लोक उपस्थित राहतील असा आमचा अंदाज आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील विविध संस्था आणि व्यक्तींच्यावतीने निवेदने दिली जाणार आहेत. ही निवेदने निरीक्षक प्रसाद लाड आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे स्वीकारून मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांनाच मुख्यमंत्र्यांची भेट घेता येणार नाही. आ. लाड म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तसाच प्रतिसाद सिंधुदुर्गात आणि कोकणातही मिळणार आहे. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची पोचपावती या महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने मिळणार आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. कोकणच्या विकासाबाबत मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील असे आ. लाड यांनी सांगितले.
