रिफायनरी समर्थक आणि विरोधक घालणार मुख्यमंत्र्यांना साकडे

0

राजापूर : महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री कोकणच्या दौर्‍यावर मंगळवारी येत आहेत. यात काहीकाळ राजापुरात त्यांच्या थांबा असणार आहे. यावेळी नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थक आणि विरोधक ‘आमने-सामने’ येण्याची शक्यता आहे. आपल्या मागण्यांची  निवेदने मुख्यमंंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील वाढती बेरोजगारी लक्षात घेवून रिफायनरी प्रकल्पाच्या रद्द केलेल्या अधिसुचनेबाबत फेरविचार करावा,  प्रकल्प येथून अन्यत्र स्थलांतरीत करू नये, यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठान, रत्नागिरी रिफायनरी समर्थन संघटनेच्यावतीने निवेदन दिले जाणार आहे. दुसरीकडे जनतेच्या आंदोलनाची दखल घेवून शासनाने प्रकल्प रद्द केल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करणारे पत्र त्यांना देण्याची तयारी प्रकल्प विरोधकांनी केली असल्याची माहिती पुढे आली आहे. मागील दोन वर्षे विविध आंदोलनांनी सातत्याने चर्चेत राहिलेल्या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाची अधिसुचना गत मार्च महिन्यात शासनाने रद्द केली होती त्याचे प्रकल्पविरोधकांकडून स्वागत झाले होते. मात्र नंतर रद्द केलेला रिफायनरी प्रकल्प नाणारमधून अन्यत्र हलवला जावू नये, म्हणून प्रकल्प समर्थक सरसावले होते. प्रकल्प समर्थनार्थ रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढताना शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला होता.त्यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठान, रत्नागिरी रिफायनरीसमर्थन संघटनेच्यावतीने रिफायनरी प्रकल्प नियोजीत जागीच व्हावा व रोजगाराची साधने वाढावीत म्हणून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान प्रकल्प समर्थनार्थ अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांची महाजनादेश यात्रा राजापुरात येत असून त्या यात्रेचे स्वागत करणारे फलक कोकण जनकल्याण प्रतिष्ठान, रत्नागिरी रिफायनरी समर्थन संघटनेच्या वतीने लावण्यात आले आहेत. शासनाने  रद्द केलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत  फेरविचार करावा, या मागणीसाठी प्रकल्प समर्थक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून त्यांना एक निवेदन देखील देणार आहेत. मागील अनेक आंदोलनानंतर शासनाने प्रकल्प विरोधकांच्या भावनांचा आदर करीत रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेवून आभार व्यक्त करणारे पत्र प्रकल्प विरोधक त्यांना  देणार असल्याची चर्चा सोमवारी ऐकायला मिळाली. मात्र प्रकल्प विरोधक खरोखरच तसे आभार व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना देणार आहेत का? याबाबत निश्चीत कळत नव्हते. त्यामुळे महाजनादेश यात्रेनिमित्त राजापुरात येणार्‍या मुख्यमंत्र्यांना प्रकल्प समर्थकांसह प्रकल्प विरोधकांपैकी कोण निवेदन वा पत्र देणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here