रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडणाऱ्या टँकरचालकांना ग्रामस्थांनी दिला चोप

0

खेड : प्रदूषणाच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असलेल्या लोटे एमआयडीसी येथील रासायनिक कारखान्यांमधून येणारे घातक रासायनिक सांडपाणी रात्री उघड्यावर सोडणाऱ्या दोन टँकरचालकांना स्थानिक ग्रामस्थांनी भल्या पहाटे पकडून चांगलाच चोप दिला. संबंधित दोन्ही टँकर चालकांना ग्रामस्थांनी खेड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

लोटे एमआयडीसीमधील दोन कंपन्यांमधून गेल्या दीड वर्षापासून हा भयानक प्रकार सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत ओढे आणि नाल्यांमध्ये अज्ञात टँकरचालक रासायनिक कंपन्यांमधून आलेले घातक रासायनिक सांडपाणी सोडत आहेत. लोटे परिसरात तसेच महामार्गावर कशेडी घाटात असे प्रकार वारंवार घडले असून याबाबत खेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र हा प्रकार नेमके कोण करत आहे, याबाबत माहिती मिळत नव्हती. रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या सुमारास हा प्रकार होत होता. गेल्या आठवड्यापासून लवेल आणि असगणी गावानजीक ओढ्यामध्ये अशाच प्रकारे केमिकल ओतण्याचा प्रकार घडला होता. ओढ्याचे पाणी पुढे नदीला मिळते आणि नदीकाठी पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी योजना असल्याने ग्रामस्थ चांगलेच संतापले होते. काही जागरूक नागरिकांनी रात्री गस्त घातली. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ओढ्यानजीक टँकर उभा राहिलेला दिसला. जवळ जाऊन पहिले असता टँकरमधून रासायनिक सांडपाणी थेट ओढ्यात सोडले होते. हा प्रकार दिसताच ग्रामस्थांनी फोनवरून गावातील लोकांना बोलावले. एक टँकर सांडपाणी सोडून रिकामा केला गेला होता, तर दुसरा सोडण्याच्या तयारीत होता. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत संतापाच्या भरात दगडफेक करत टँकरच्या काचा आणि हेडलाइट फोडून टाकले. टँकरचालक पळून लोटे येथे लपून बसले. खेडमधून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, घाणेखुंटचे अंकुश काते, जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे, यांच्या सुमारे ६० कार्यकर्ते पटवर्धन लोटे या ठिकाणी जमा झाले. त्यांनी लपून बसलेल्या दोन्ही टँकरचालकांना शोधून आणले. त्यांना जमावाने चांगलाच चोप दिला. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर सीईटीपीचे अधिकारी चव्हाण यांच्यामार्फत टँकरचालकांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:08 PM 24-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here