राजापूर : मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा राजापुरात येत असून त्याची जय्यत तयारी झाली आहे. सायंकाळी 4 वाजता राजापूर एसटी आगारासमोर महाजनादेश यात्रेचे स्वागत केले जाणार असून नंतर मुख्यमंत्र्यांची छोटेखानी सभा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मंगळवार दि. 17 सप्टेंबरला सिंधुदुर्ग येथून सायंकाळी चार वाजता राजापुरात येत आहे. त्यादृष्टीने तालुका भाजपात जोरदार उत्साह पसरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे उपाध्यक्ष आ.प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे पदाधिकारी जोरदार कामाला लागले आहेत. मुंबई- गोवा महामार्गावरील राजापूर एसटी आगारासमोर या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.त्यानंतर मुख्यमंत्र्यांची एक छोटेखानी सभा पार पडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आडीवरे, पावसमार्गे रत्नागिरीकडे रवाना होईल, अशी माहिती भाजप सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. गेले दोन दिवस पावसाचा वाढलेला जोर देखील काहीसा चिंतेचा विषय बनला आहे. मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेमुळे प्रशासन सज्ज झाले आहे.पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारीही सज्ज झाले आहेत. आता आजच्या दौर्याकडे लक्ष आहे.
