जलसंपदा विभागाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील अपूर्ण १७ प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी ४७ कोटींची आवश्यकता

0

रत्नागिरी : जलसंपदा विभागाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील अपूर्ण १७ प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी ४७ कोटी ३० लाखाची आवश्यकता आहे. दुरूस्तीसाठी निधी देणे शासनाने बंद केले आहे. आता जिल्हा नियोजन निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा नियोजनला प्रस्ताव पाठविले जातील तर रत्नागिरी जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी कॅनल ऐवजी आता पाईपलाईनचा वापर करण्यात येणार आहे अशी माहिती कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष विक्रांत आंब्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सोमवारी श्री. आंब्रे यांनी कोकण पाटबंधारे विभागाचा आढावा घेतला. रत्नागिरी जिल्ह्यात पाटबंधारे विभागाचे ८८ प्रकल्प मंजूर आहेत त्यापैकी ७१ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये १ मध्यम ६ लघु तर ९ कोल्हापुरी टाईपचे बंधारे आहेत. तर १७ प्रकल्पांची कामे सुरू आहेत त्यासाठी ४७ कोटी ३० लाख आवश्यकता आहे. दुरुस्तीवर आतापर्यंत तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित धरणांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून पैसे उपलब्ध झालेले नाहीत. सिंचन करातून धरणाची दुरुस्ती करण्याचा शासनाचा निर्णय आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात सिंचन सिंचन क्षेत्र कमी असल्याने त्यातून अत्यल्प कर मिळतो. त्यामुळे या निधीतून दुरुस्त करणे शक्य नाही. परंतु नवीन शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून घेण्याची सूचना शासनाने केली आहे त्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तिवरे धरण फुटल्यानंतर राज्यातील सर्व धरणांचे ऑडिट करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार रत्नगिरीतील धरणाच्या ऑडिट करण्यात आले आहे. या ठिकाणी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक निधी शासनाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे श्री आंब्रे यांनी सांगितले. कोकणात मोठ्या प्रमाणावर धरण प्रकल्प आहेत. परंतु, या प्रकल्पांच्या देखरेख करण्यासाठी सुरक्षा रक्षकच नाहीत. प्रकल्पांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असणे अत्यावश्यक आहे. अनेकदा धरणांच्या ठिकाणी खेकडे मारण्यासाठी ग्रामस्थ जातात. खेकडे काढताना दगड हलवले जातात आणि यातुनच एखादी दुर्घटना घडते. सुरक्षा रक्षक असल्यास या बाबी टाळता येऊ शकतात असे आंब्रे यावेळी म्हणाले.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here