रत्नागिरी : हंगामाच्या सुरूवातीलाच तोट्यात चाललेला पर्ससीन व्यवसाय पुन्हा उभा रहावा यासाठी पर्ससीन मच्छीमार तालुका पर्ससीन संघटनेच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेणार आहे. परप्रांतीय नौकांची घुसखोरी, सततची वादळी परिस्थिती आणि कमी होत चाललेले मासेमारीचे दिवस यामुळे राज्याचे सागरी मत्स्य उत्पादन सातत्याने कमी होत आहे. घटणाऱ्या उत्पन्नामुळे किनारपट्टीवरील मच्छीमारांसमोर अनेक संकटे येत आहेत. यामुळे मच्छीमार या व्यवसायापासून दूर जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी पर्ससीन मच्छीमारांकडून करण्यात येत आहे. मंगळवारी महाजनादेश यात्रेच्या : निमित्ताने रत्नागिरीत येणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तालुका पर्ससीन संघटनेच्यावतीने भेट घेण्यात येणार आहे. यावेळी पर्ससीन मासेमारीवरील बंधने उठवावीत अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात येणार आहे. पर्ससीन मासेमारीबाबत डॉ. सोमवंशी समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने लागू केलेल्या काही जाचक अटी रद्द करण्याची : मागणी करण्यात येणार आहे. यामध्ये पर्ससीन मासेमारीला पूर्ण हंगाम मासेमारीची मुदत द्यावी आणि पर्ससीन, मिनी पर्ससीन आणि रिंगसिन परवाने पुन्हा चालू करावेत अशी मागणी करण्यात येणार आहे. प्रत्येक क्षेत्रात शासन नवनवीन तंत्रज्ञानाचा वावर करत आहे. परंत. एकट्या मासेमारी क्षेत्रात पारंपरिक पध्दतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात अला आहे. पर्ससीन मासेमारीसाठी ८० लाखापेक्षा अधिक गुंतवणूक करावी लागते. ही गुंतवणुक केवळ चार महिन्यांसाठी वापरणे संयुक्तिक नाही. सर्व खर्च भागवताना बोट मालकाला तारेवरची कसरत करावी लागत असल्याने मासेमारीची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस मत्स्योत्पादनात घट होत आहे. यामुळे देशाला मिळणाऱ्या परकीय चलनातही घट होत आहे. याशिवाय मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याचे नियम ५० वर्षांपूर्वीचे आहेत. परंतु, सततचा मत्स्य दुष्काळ, खराब सागरी वातावरण आणि जोखीम याचा विचार करून मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याचे धोरण बदलणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. मत्स्य व्यवसाय हा कृषी संलग्न व्यवसाय आहे. यामुळे याला कृषीचा दर्जा मिळाल्यास या व्यवसायाला सवलती लागू होऊ शकतात. मत्स्य व्यवसायाचे झालेले नुकसान, कर्ज प्रकरणे व अन्य लाभ मच्छीमारांना मिळणे शक्य आहे.
