देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये मधलीवाडी येथील एका महिलेची तालुक्यातील डिंगणी मोहल्ला येथील एका युवकाने फसवणूक केली आहे. महिलेने संगमेश्वर पोलीस ठाण्यात युवकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलीस यंत्रणेकडून युवकावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. युवकावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास २ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय महिलेने घेतला आहे. याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांना देण्यात आले आहे. रेश्मा चंद्रकांत बाल्ये (रा. कोंड्ये मधलीवाडी) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. डिंगणी मोहल्ला येथील सर्फराज दाऊद खान याला रिक्षा खरेदी करण्यासाठी बाल्ये यांनी ५० हजार रूपये दिले होते. सर्फराज याने तुम्हाला लवकरात लवकर रक्कम परत करतो असा शब्द बाल्ये यांना दिला होता. या घटनेला दोन वर्षे झाली आहेत. वारंवार पैशाची मागणी केली असता, तो दमदाटी व धमकी देतो असे सौ. बाल्ये यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. सर्फराज याने पूर्वी ५० हजार रूपयांचा चेक दिला होता. मात्र तोही बाऊन्स झाल्याचे नमूद केले आहे. यावर सौ. बाल्ये यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात सर्फराज विरूद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रार करूनही पोलीस यंत्रणेकडून सर्फराज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचे बाल्ये यांनी निवेदनात नमूद केले आहे. जोपर्यंत सर्फराज खान याच्यावर पोलीस कारवाई किंवा गुन्हा दाखल करणार नसतील तर २ ऑक्टोबर रोजी आपण पोलीस प्रशासनाविरोधात उपोषणाला बसण्याचा निर्णय सौ. बाल्ये यांनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
