चिपळूण : चिपळूण आगारातील व्हीटीएस यंत्रणा पंधरवड्यात कार्यान्वित होणार असून आतापर्यंत १०३ बस गाड्यांना सिग्नल यंत्रे बसवली आहेत. यामुळे प्रवाशांना बसगाड्यांची ऑनलाईन माहिती उपलब्ध होणार आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक, ठाणे व चिपळूण आगाराची व्हीटीएस यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी निवड झालेली होती. त्यानुसार आतापर्यंत या यंत्रणेचे सॉफ्टवेअर सुरु झाले आहे. तसेच १०३ बसगाड्यांना सिग्नल बसवले गेले आहेत. उर्वरित गाड्यांवर सिग्नल मोड बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पुढील पंधरवडाभरात ही यंत्रणा संपूर्ण क्षमतेसह कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे एकाचवेळी एस.टी. प्रशासनाला हवी असलेली माहिती व प्रवाशांना ऑनलाईन माहिती देण्याची सोय होईल. रेल्वे खात्याप्रमाणेच ऑनलाईन माहिती प्रवाशांना त्यांच्या मोबाईल अथवा इंटरनेटवर मिळणार आहे. प्रत्येक एस.टी.च्या बाबतीत विस्कळीत ड्रायव्हिंग (रॅश ड्रायव्हिंग), रुट ब्रेक, हेवी ब्रेकींग, टर्मिनल पॉईंट ब्रेक या चार निकषांची माहिती ऑनलाईन पध्दतीने आगाराच्या स्क्रीनवर उपलब्ध होणार आहे. चालकाने योग्य पध्दतीने गाडी चालविली किंवा नाही हे प्रशासनाला कळणार आहे. यासोबत अचानक करकचून ब्रेक दाबल्यास त्याचे सिग्नल डेपोला मिळतील. ठराविक रस्ता सोडून एस.टी. दुसऱ्या रस्त्याने नेल्यास किंवा स्थानकाची जागा सोडून इतरत्र एस.टी. उभी केल्यास त्याच्या नोंदी होणार आहेत. त्यामुळे एस.टी. वाहतूक अधिक चांगली होण्याच्या दृष्टीने या नोंदी महत्वाच्या ठरणार आहेत. प्रवाशांना आता प्रत्येक गाडी मार्गावर नेमकी कुठे आहे, हे ऑनलाईन पध्दतीने पाहता येईल. तसेच बस स्थानकावर वीस मिनिटांच्या अंतराने पोचणाऱ्या गाड्यांच्या सूचना प्रवाशांना स्क्रीनवर पाहण्यास मिळतील. त्यामुळे प्रवाशांच्या एस.टी.च्या प्रतिक्षेसाठी लागणाऱ्या वेळेची बचत होणार आहे. तसेच ऑनलाईनवर एस.टी. कुठे आहे हे समजत असतानाच त्यासोबत वाहक व चालकांशी संपर्क होऊ शकेल. गाडीत बिघाड झाल्यास तातडीने दुसरी गाडी मदतीसाठी पाठवता येणार आहे.
