देवरूख : शहरातील राज काकडे हेल्प अॅकॅडमीच्यावतीने गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी महिला व पुरुषांसाठी आगळ्यावेगळ्या स्लो बाईक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास अपघात टळू शकतात. तसेच कमी वेग आणि हेल्मेट वापर असा सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धा घेण्यात येणार आहे. गतवर्षी सावरकर चौक मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. यावर्षी स्लो बाईक स्पर्धेला २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सावरकर चौक येथील मैदानावर प्रारंभ होणार आहे. स्पर्धा पुरूष व महिला अशा दोन गट घेण्यात येणार आहे. पुरूष गटातील प्रथम क्रमांकास २ हजार २२२ रूपये, द्वितीय क्रमांकास १ हजार १११ रूपये, तृतीय क्रमांकास ५५५ रूपये रोख बक्षिसे दिले जाणार आहे. महिला गटातील प्रथम क्रमांकास १ हजार १११ रूपये, द्वितीय क्रमांकास ७११ रूपये, तृतीय क्रमांकास ५११ रूपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. मदतनिधीसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात येणार आहे. मोबाईल (प्रथम), म्युझिक सिस्टिम (द्वितीय), टेबल फॅन (तिसरे) यांसह इतर ४० आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेच्या अधिक माहिती व नावनोंदणीसाठी गणेश जंगम, अण्णा बेर्डे, जयवंत वाईरकर, प्रमोद हडीकर, बाळू आंबवकर, युयुत्सु आते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अॅकॅडमीच्यावतीने करण्यात आले आहे.
