मिरारोड : मिरा-भाईंदर महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे कला दालनाच्या निविदा विषयाला स्थगिती दिल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी स्थायी समिती सभागृहाची तोडफोड केली. यावेळी सभागृहाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी महापौर दालनाचीही तोडफोड केली. तसेच महापालिका मुख्यालय दणाणून सोडले. या विषयी अधिक माहिती अशी की, भाईंदर पूर्वेकडील आरक्षण क्र.122 या जागेत हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन बांधण्याचा ठराव, 19 मे 2017 च्या महासभेत मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी 25 कोटी रुपयांची प्रशासकीय व आर्थिक मान्यता तसेच दालनाच्या नकाशांना नगररचना विभागाने मंजुरी दिलेली होती. तसेच आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार रवींद्र फाटक यांनी आमदार निधीतून प्रत्येकी 25 लाख असे 50 लाख रुपये खर्चास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 73 (क) नुसार 25 लाख रुपये रकमे वरील कामांच्या निविदांना मान्यता देण्याचे अधिकार स्थायी समितीला असल्याने, आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे कला दालनाच्या निविदाचा विषय होता. परंतु सभापती रवी व्यास यांनी दालनासाठी येणाऱ्या निधीचा तपशिल प्रशासनाकडे मागितला आहे, असे सांगत निविदेचा विषय स्थगित केला. त्यामुळे शिवसेना नगरसेवक संतापले आणि सभागृहाची तोडफोड केली. तसेच असे काही होणार असल्याची पूर्व कल्पना असल्याने मोठया संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक सभागृहाबाहेर जमा झाले होते. सभागृहात तोडफोड सुरू झाल्यावर बाहेर सुद्धा शिवसैनिकांनी शिविगाळ करत मुख्यालय दणाणून सोडले. यावेळी महापौरांच्या दालनात घुसून महापौर दालनाचीही तोडफोड करण्यात आली. दालनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समोरील फोन, झेरॉक्स मशिन, खुर्च्या, टेबलाचीदेखील तोडफोड करण्यात आली. महापालिकेत जमलेल्या शिवसैनिकांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना शिवीगाळ केली. तसेच विधानसभा निवडणुकीत युती झाल्यास भाजपाचा प्रचार करणार नसल्याचा घोषणा दिल्या. दरम्यान भाईंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव हे पोलिस फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले.
