नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना एका सामन्याच्या फिक्सिंगसाठी पैशांची ऑफर दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे क्रिकेट जगतात एकच खळबळ माजली आहे. बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून दोन लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. राकेश बाफना आणि जितेंद्र कोठारी यांच्याविरुद्ध मॅच फिक्सिंग आणि फसवणूक केल्याबद्दल एफआयआर (FIR)दाखल करण्यात आली आहे. बाफनाने भारताच्या राष्ट्रीय महिला संघातील एका सदस्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तसेच या क्रिकेटरला मॅच फिक्सिंगसाठी मोठी रक्कम देण्याचे आमिष दाखवले. हा प्रकार फेब्रुवारीमध्ये झाला होता. अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. त्यावेळी इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेची तयारी महिला संघ करत होता. ही मालिका आयसीसीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपचा भाग होती. तसेच लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे प्रमुख अजित सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिला क्रिकेटरने बीसीसीआय़ला संपूर्ण माहिती दिली आहे. याशिवाय एका आरोपीशी झालेले संभाषणाचे रेकॉर्डिंगही महिला क्रिकेटरने दिले आहे. तसेच ओडिशात राहणाऱ्या बाफनाने भारत इंग्लंड यांच्यातील एक सामना फिक्स करण्यासाठी महिला क्रिकेटरला १ लाख रुपये देण्याची ऑफर दिली होती. बाफनाने फक्त महिला क्रिकेटपटूला मॅच फिक्सिंगमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला नाहीतर संघाच्या कर्णधाराशी देखील संपर्क करण्याचा डाव होता. जेव्हा महिला क्रिकेटरला यात काहीतरी चुकीचं होत आहे याचा संशय आला तेव्हा एसीयूला संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. स्पोर्ट्स मॅनेजर जितेंद्र कोठारी यांनी सामाजिक माध्यमाद्वारे भारतीय क्रिकेट खेळाडूंशी संपर्क केला होता. त्यानंतर मॅच फिक्सिंग करण्यासाठी पैशाचे अमिष दाखवले. यासर्व घडामोडींची चौकशी आयसीसी करत आहे. दरम्यान तामिळनाडु प्रीमियर लीगमध्येही फिक्सिंगची चौकशी सुरू आहे.
