चिदंबरम यांच्याशी संबंधित सर्व खटले दुसऱ्या न्यायालयाकडे वर्ग

0

नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याशी संबंधित एअरसेल-मॅक्सिस प्रकरणाचे सर्व खटले विशेष न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांच्या न्यायालयाकडून न्यायमूर्ती अजयकुमार कुहार यांच्या न्यायालयाकडे वर्ग करण्याचा आदेश दिल्‍ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. आयएनएक्स मीडीया घोटाळा प्रकरणाशी संबंधित खटल्यांची सुनावणी सध्या न्यायमूर्ती कुहार यांच्या न्यायालयासमोर सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर एअरसेल-मॅक्सिस प्रकरणाशी संबंधित खटलेही या न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत. एअरसेल मॅक्सिस आणि आयएनएक्स मीडीया अशा दोन्ही घोटाळा प्रकरणात चिदंबरम आणि त्यांचे पूत्र कर्ती हे मुख्य आरोपी आहेत. न्यायमूर्ती ओ. पी. सैनी हे चालू महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्‍त होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर एअरसेल मॅक्सिसशी संबंधित सर्व खटले न्यायमूर्ती कुहार यांच्या न्यायलयाकडे वर्ग केली जात असल्याचे दिल्‍ली उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. प्रामुख्याने राजकारण्यांशी संबंधित खटल्यांची सुनावणी न्यायमूर्ती कुहार यांच्या न्यायालयासमोर सुरू आहे. यात कर्नाटकातील काँग्रेसचे दिग्गज नेते डी. के. शिवकुमार, राजदचे नेते लालूप्रसाद यादव, हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते वीरभद्र सिंग आदी नेत्यांच्या प्रकरणांचा समावेश आहे. सेवानिवृत्‍त होत असलेले न्यायमूर्ती सैनी हे टूजी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणाच्या सुनावणीवेळी चर्चेत आले होते. डिसेंबर २०१७ मध्ये न्यायमूर्ती सैनी यांनी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील प्रमुख आरोपांची निर्दोष मुक्‍तता केली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here