रत्नागिरी : गणपतीपुळे तीर्थक्षेत्री मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त हजारो भाविकांनी स्वयंभू श्री गजाननाच्या दर्शनाचा लाभ घेतला. दिवसभर पावसाने उघडीप दिल्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ न भिजता घेता आला. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात अंगारकी चतुर्थीमुळेे मंगळवारी दिवसभर सांगली, सातारा, मिरज व घाटमाथ्यावरील भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. पहाटे 3.30 पासूनच भाविकांनी दर्शन मिळणार यासाठी रात्री 2 वा.पासून दर्शन रांगा लावल्या होत्या. पहाटे 3 वा. 30 मि. मंदिर दर्शनासाठी खुले झाले. यावेळी प्रथम स्वयंभू श्री गजाननाची महापूजा झाली. नंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात सायंकाळी ठीक 4.30 वा. स्वयंभू श्रींची पालखीची अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्ताने ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी पालखी मिरवणुकीत संस्थान श्रीदेव गणपतीपुळेचे प्रमुख पंच मंडळी देवस्थानचे कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व इतर ग्रामस्थ तसेच घाटमाथ्यावरून आलेले भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पालखी मिरवणुकीत ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या अंगारक चतुर्थीनिमित्त एस. टी. प्रशासनातर्फे भाविकांच्या
सोयीसाठी जादा एसटी गाड्यांची सोय करण्यात आली. तसेच पोलिस प्रशासनातर्फे संपूर्ण गणपतीपुळे परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, संस्थान श्रीदेव गणपतीपुळेतर्फे बांधण्यात आलेल्या सर्व रांगा दुपारी दोन वाजेपर्यंत फुल्ल होत्या. लोक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत होते. दर्शनासाठी मोठीच्या मोठी रांग लावल्याचे दिसून येत होते. संपूर्ण दर्शन लाईन्सवर मोठ्या प्रमाणात पाण्याचे वाटप तसेच अनिरुद्ध उपासना केंद्राचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मेहनत घेताना दिसत होते.रत्नागिरीत मंगळवारी भाजपची महाजनादेश यात्रा असल्यामुळे उत्तर रत्नागिरीतून अनेक कार्यकर्त्यांनी प्रथम गणपतीपुळे येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर रत्नागिरीतील सभेला उपस्थित राहिले.
