रत्नागिरी दि.18:- जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम 16 सप्टेंबर 2019 रोजी आत्महत्या प्रतिबंधात्मक दिनाचे औचित्य साधून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बोल्डे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण, ईएनटी सर्जन डॉ. संघमित्रा फुले, मानसोपचार तज्ञ डॉ. मयुरा भागवत, डॉ. नितिनकुमार शहा आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे यांनी आयुष्यात समाधानी रहा, जास्त अपेक्षा ठेवू नका, आपली बौध्दीक व शारीरिक क्षमता ओळखून निर्णय घ्या व आत्महत्येपासून इतरांनाही वाचवा व तुम्हीही आनंदी जीवन जगा असा सल्ला दिला. डॉ. भागवत यांनी सांगितले व्यक्ती मला जगावस वाटत नाही असे बोलत असेल, स्वत:च्या वस्तू व पैसे वाटून टाकत असेल तर अशी व्यक्ती नैराश्यग्रस्त असून आत्महत्येचा विचार करत असते अशा वेळी त्या व्यक्तीचे म्हणणे गांर्भीयाने घेतले पाहिजे अशा व्यक्तीला मोकळेपणाने बोलू दिले पाहिजे. अशा व्यक्तीला एकटे सोडू नका, मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या.
यावेळी नर्सिंग स्कूल जिल्हा रुग्णालय रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी रुग्णालय ते बसस्थानक अशी प्रभातफेरी काढली व आत्महत्या प्रतिबंध यावर पथनाट्य सादर केले. 10 सप्टेंबर हा आत्महत्या प्रतिबंधक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाला जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या व रुग्णालयातील इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
