पोलिसांचे गुजरातमधील तीन हायस्पीड ट्रॉलर पकडण्यात यश

0

मालवण : समुद्रात घुसून मासळीची लूट करणार्‍या परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरवर कारवाईसाठी समुद्रात उतरलेल्या आ. वैभव नाईक यांच्यासह मत्स्य, पोलिस कर्मचार्‍यांच्या पथकाने गुजरातमधील तीन ट्रॉलर पकडण्यात यश मिळविले. हे तिन्ही ट्रॉलर सोमवारी रात्री येथील बंदरात आणण्यात आले. या  तिन्ही ट्रॉलरवरील मासळीचा सुमारे 1 लाख 79 हजार 680 रुपयांना लिलाव करण्यात आला. संबंधितांवर कडक कारवाईसाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्‍त प्रदीप वस्त यांनी दिली. गेले काही दिवस सातत्याने जिल्ह्याच्या सागरी जलधी क्षेत्रात परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्संनी हैदोस घातला असून मासळीची लूट सुरू ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. यापुढेही ही कारवाई सुरू ठेवण्याचे आदेश सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्‍तांना देण्यात आले आहेत. यापुढेही घुसखोरी सुरू राहिल्यास त्या बोटी सील करण्याची कार्यवाहीही केली जाईल, असा इशारा आ. नाईक यांनी दिला. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सधारकांकडून जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासळीची लूट करण्याबरोबरच स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यांची तोड केली जात होती. त्यामुळे याप्रश्‍नी आक्रमक बनलेले आ. वैभव नाईक हे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, सन्मेश परब, राजू कुर्ले, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्‍त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, पोलिस कर्मचार्‍यांसह गस्तीनौकेद्वारे रात्री समुद्रात कारवाईसाठी रवाना झाले. समुद्र खवळलेला तसेच वार्‍याचा जोर कायम असतानाही गस्तीनौकेद्वारे हायस्पीड ट्रॉलर्सचा थरारक पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या धडक कारवाईत गुजरात येथील तीन ट्रॉलर्स पकडण्यात यश आले. रात्री उशिरा हे तिन्ही ट्रॉलर्स येथील बंदरात आणण्यात आले. या ट्रॉलर्सवरील खलाशी तसेच महत्वाची कागदपत्रे मत्स्यव्यवसायच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतली. या तिन्ही ट्रॉलर्सवरील मासळीचा मंगळवारी सकाळी मासळी मंडईनजीक लिलाव करण्यात आला. यात माँ भगवती वादवा कृपा आयएनडी-जीजे-11 एमएम-3052 या ट्रॉलरवर 49 हजार 200 रुपयांची मासळी आढळली. नारायणी-12 आयएनडी-जीजे- एमएम-12465 या ट्रॉलरवर 72 हजार 840 रुपयांची मासळी आढळली. राम बलराम आयएनडी- जीजे-11- एमएम-12783 या ट्रॉलरवर 57 हजार 640 रुपयांची मासळी आढळली. याप्रकरणी या तिन्ही ट्रॉलर्सच्या मालकांविरोधात तहसीलदारांकडे कारवाईसाठी प्रतिवेदन सादर केले जाणार असल्याचे  श्री. वस्त यांनी स्पष्ट केले. परराज्यातील ट्रॉलर्सच्या घुसखोरीविरोधात स्थानिक मच्छीमारांमारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. यापुढेही गस्तीनौकेद्वारे कडक कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे. यासाठी पोलिसांनीही सहकार्य करावे असे आवाहन श्री. वस्त यांनी केले. परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी होत असताना कारवाईसाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी मत्स्यव्यवसाय विभागाकडे उपलब्ध नव्हते. मात्र मत्स्य व्यवसाय विभागातील तीन रिक्‍त पदे भरण्यात आली असून उर्वरित एक पदही येत्या दोन-चार दिवसात भरण्यात येईल. परराज्यातील ट्रॉलर्सच्या घुसखोरीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने यापुढेही धडक कारवाई मोहीम सुरू ठेवण्याचे आदेश असल्याचे आ. नाईक यांनी  सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here