कणकवली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यामुळे आपण त्यांचे स्वागत केले. लवकरच आपण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण करून मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आ. नीतेश राणे हे निवडणूक रिंगणात असतील, अशी स्पष्ट माहिती माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी मंगळवारी कणकवलीत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिली. त्यामुळे खा. राणे यांचा भाजप प्रवेश आता जवळपास निश्चित मानला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी दुपारनंतर कणकवलीत दाखल झाली. खा. नारायण राणे सोमवारीच सिंधुदुर्गात आले होते. त्यांनी स्वतः पक्षाच्या कार्यालयाबाहेर मुंबई-गोवा महामार्गावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत आ. नीतेश राणे, माजी खा. नीलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, संध्या तेरसे, जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत व जिल्ह्यातील स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी खा. राणे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री हा कोणत्या पक्षाचा नसतो, तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो. मुख्यमंत्री सिंधुदुर्गात येत असताना त्यांचे स्वागत करणे हे माझे कर्तव्य समजतो. भाजपमध्ये मी लवकरच प्रवेश करणार असल्यामुळे भविष्याकडे पाहून आज मी त्यांचे स्वागत केले, असे म्हणायला हरकत नाही. त्याचवेळी माणुसकीच्या दृष्टीकोनातून त्यांचे स्वागत केले. महाजनादेश यात्रेच्यावेळी माझा भाजप प्रवेश होईल असे जे म्हटले जात होते ते चुकीचे आहे. माझा भाजप प्रवेश हा मुंबईत व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे जो प्रवेश होईल तो मुंबईत होईल आणि हा प्रवेश लवकरच होईल त्यासाठी पत्रकारांना फार वेळ थांबावे लागणार नाही असेही खा. राणे यांनी सांगितले. भाजप प्रवेश करण्यासंबंधी काय आश्वासने किंवा मागण्या झाल्या आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना खा. राणे म्हणाले, माझ्या कोणत्या मागण्या नाहीत . जेव्हा प्रवेश होईल त्याचवेळी सर्व गोष्टी होतील. भाजपमधून तुम्ही निवडणूक लढवणार का? यावर बोलताना खा. राणे म्हणाले, मी निवडणूक लढणार नाही. कणकवलीतून विद्यमान आ. नितेश राणे हे भाजपमधून निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना-भाजप युती झाली किंवा नाही झाली तर त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर काय फरक होईल? यावर खा. राणे म्हणाले काही फरक पडणार नाही, मी ज्या दिशेने जाईन त्याच दिशेचे पारडे जड असणार आहे. म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केल्यावर तेथील पारडे जड असणार आहे.शिवसेनेचा भाजप प्रवेशाला विरोध राहील का? यावर ते म्हणाले, त्या विरोधाचा आता काही प्रश्न नाही. दोन्ही पक्षांमध्ये काहीही होवो, माझा भाजप प्रवेश होईल असा विश्वास वाटतो. माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास आहे. त्यांनी जो मला शब्द दिला तो ते पूर्ण करतील असे मला वाटते म्हणून मी थांबलो. सभेला जर आमंत्रण दिले असते तर मी त्या सभेला असतो असेही खा. राणे म्हणाले.
