कणकवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती दिली. महामार्ग चौपदरीकरणाचे 80 टक्के पॅकेज पूर्ण केले असून उर्वरित पॅकेजही मार्गी लावू. अशा प्रकारे कोकणात एकीकडे रस्ते, बंदरे आणि चिपी विमानतळ यांची कनेक्टिव्हिटी करून आंबा, काजूच्या निर्यातीला चालना देत मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ निर्माण करून दिली जाईल. येत्या तीन वर्षांत कोकण टँकरमुक्त करू. दळणवळण आणि पर्यटन विकासातून समृद्ध कोकण घडविला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाजनादेश यात्रेला राज्यभर मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विधानसभेवर भाजप महायुतीचा झेंडा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसर्या टप्प्याची सुरुवात मंगळवारी सिंधुदुर्गातून झाली; मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौर्यात ऐनवेळी बदल झाल्याने मुख्यमंत्र्यांचे सिंधुदुर्गातील आगमन लांबले. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री कणकवलीत सभास्थळी पोहोचणार होते मात्र लांबलेल्या दौर्यामुळे सायंकाळी पावणेसहा वाजता त्यांचे सभास्थळी आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यासमवेत सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, शिक्षणमंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा.किरीट सोमय्या, आ.प्रसाद लाड, आ.प्रवीण दरेकर, आ.निरंजन डावखरे, माजी आ.कालिदास कोळंबकर, भाजप प्रदेशचे जनरल सेक्रेटरी सुरजितसिंग ठाकूर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजप नेते संदेश पारकर, राजन तेली, अतुल रावराणे, अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. स्नेहा कुबल, संघटनमंत्री सतीश धोंड, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, भाजप जिल्हा प्रवक्ते जयदेव कदम, राजू राऊळ, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरूवातीलाच आपला दौरा लांबल्याने उपस्थितांची दिलगिरी व्यक्त केली. सकाळी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने औरंगाबादला गेलो, तेथून कोल्हापूरला आलो. कोल्हापूर जिल्ह्यात महाजनादेश यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावातील लोकांनी एवढे उत्स्फूर्तपणे स्वागत केले की या सभेला यायला उशीर झाला. सभेला तीन तास उशिर झाल्याने या ठिकाणी रिकाम्या खुर्च्या बघायला मिळतील असे वाटले होते, मात्र येथील लोकांनी तरीही दाखविलेली उपस्थिती पाहून आपण भारावलो आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात 18 हजार गावात पिण्याच्या पाण्याची योजना केली. 30 हजार कि.मी.चे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केले. या देशातील कुठल्याही राज्याने 10 हजार कि.मी.चे ग्रामीण रस्ते तयार केले नव्हते, ते आम्ही केले. ते म्हणाले, देवतांच्या दर्शनासाठी यात्रा केली जाते, मात्र आमची महाजनादेश यात्रा ही आमचे नेते नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे मायबाप जनताजनार्दनाच्या दर्शनासाठी आहे. महाराष्ट्रातील 12 कोटी जनता आमचे दैवत आहे. लोकसभेला आम्हाला चांगले यश मिळाले त्यामुळे विधानसभेलाही चांगले यश मिळेल असे असताना यात्रा कशाला? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. आम्ही सर्व विरोधकांना चितपट केले आहे. आमची यात्रा ही जनतेशी संवाद साधण्यासाठी आहे. गेल्या पाच वर्षात जे काम केले ते जनतेसमोर मांडून त्यांचे आशीर्वाद घेणे हा आमचा उद्देश आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमख एखादा मुख्यमंत्री आणि मंत्री पाच वर्षात केलेली कामे घेवून जाते आहेत, जनतेचे प्रश्न समजून घेत आहेत. महाजनादेश यात्रेला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता येत्या काळात याहीपेक्षा जास्त काम करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
