मृत्यूला घाबरू नका, शी जिनपिंग यांचे सैनिकांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे आवाहन

0

विस्तारवादी धोरणामुळे चीनचा अनेक देशांशी सीमेवरून वाद सुरू आहे. हिंदुस्थानमध्ये लडाख सीमेवरही हिंदुस्थान-चीनमध्ये तणाव कायम आहे. तणाव कमी करण्यासाठी हिंदुस्थानचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सहमती दर्शवल्यानंतरही चीनचे सैन्य मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता चीनने युद्धाची भाषा सुरू केल्याने तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सैनिकांनी मृत्यूला घाबरू नये, त्यांनी युद्धाची तयारी करावी आणि युद्धासाठी सज्ज राहावे, असे आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैनिकांना केले आहे. युद्ध आपल्यालाच जिंकायचे आहे, या भावनेने सैनिकांनी तयारीला लागावे, असे ते म्हणाले. मिलिट्री कमांडर्सलाना मार्गदर्शन करताना एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या बोलण्यातून युद्धाचे संकेत मिळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. चीनच्या प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. युद्धासाठी आवश्यक असलेल्या तयारीला गती द्या, साधनसामग्री आणि शस्त्रास्त्रांची सज्जता ठेवा, असे त्यांनी आदेश दिले आहेत. याआधीही सैनिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी युद्धासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले होते. सध्या चीनचा अमेरिका, तैवान आणि हिंदुस्थानसोबत तणाव वाढला आहे. नेपाळ आणि तिबेटमध्येही चीन विस्तारवादी धोरण राबवत त्यांचा भूभाग बळकावत आहे. त्यामुळे तणावात भर पडली असतानाच जिंनपिंग युद्धाची भाषा करत असल्याने त्याला महत्त्व आले आहे. नौदलाने सर्व सामर्थ्यानिशा युद्धाची तयारी करावी. तसेच प्रत्येक आघाडीवर सतर्क राहा, असे जिनपिंग यांनी नौदलाच्या सैनिकांना मागच्या महिन्यात सांगितले होते. आता त्यांनी कमांडर्सच्या बैठकीत त्यांनी पुन्हा युद्धाला चिथावणी देणारे वक्तव्य करत सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. युद्ध जिंकण्यासाठी प्रशिक्षण आणि युद्धसराव यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रशिक्षण आणि युद्धसराव याला लष्कराने प्राधान्य द्यावे. विजयासाठी ते महत्त्वाचे आहे. त्याकडे कमांडर्सनी लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. युद्धात सामर्थ्य दाखवण्याच्या दृष्टीने तयारी करा असे ते म्हणाले. तसेच चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीला जगातील सामर्थ्यवान लढाऊ सैन्य बनवण्याचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी युद्धाला तयार राहा, असे आवाहन त्यांनी कमांडर्सना केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:34 PM 28-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here