भाजप चिपळूण कार्यकारिणीचे नव्याने नियोजन सुरू

0

चिपळूण : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष बदलानंतर जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त झाली आहे. त्यानुसार चिपळूण भाजपची तालुका व शहर कार्यकारिणी देखील बरखास्त होणार असून आता नव्याने होणार्‍या कार्यकारिणीत महिला तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, शहर अध्यक्ष म्हणून नगरसेवक आशिष खातू तर तालुकाध्यक्ष म्हणून नगरसेवक विजय चितळे यांच्या नावाची भाजप परिवारातून शिफारस करण्यात आल्याचे समजते. जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्याकडे देण्यात आली. परिणामी, जिल्ह्यातील जुनी कार्यकारिणी बरखास्त होऊन आता नव्याने कार्यकारिणीचे नियोजन सुरू झाले आहे. त्याप्रमाणे चिपळूणची जुनी कार्यकारिणी देखील बरखास्त होणार आहे. त्यानुसार तालुकाध्यक्ष, महिला तालुकाध्यक्षा, शहर अध्यक्ष आदींसह अन्य कार्यकारिणीत फेरबदल केले जाणार आहेत. या महत्त्वाच्या पदावर भाजप परिवारातील निष्ठावंत व सक्रिय लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. प्रामुख्याने काही नवीन चेहरेही जबाबदारीच्या महत्त्वाच्या पदावर दिसणार आहेत. तालुकाध्यक्ष पदासाठी नगरसेवक विजय चितळे यांच्या नावाची चर्चा आहे. विद्यमान मावळते तालुकाध्यक्ष सतीश मोरे यांच्यानंतर नव्या कार्यकारिणीची तालुक्याची जबाबदारी चितळे यांच्यावर सोपविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तालुका महिला अध्यक्षपदाची जबाबदारी चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावर सोपवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here