रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया पहाटे 3 वाजता संपली. त्याचबरोबर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचार्यांच्या भरतीला प्रक्रिया करण्यालाही दुसर्या दिवशी पहाट झाली. यामुळे एकंदरीत जि. प.मध्ये ‘रात्रीचा खेळ चाले…’ अशा पद्धतीने कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. सध्या जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी विरूद्ध पदाधिकारी व सदस्य असा संघर्ष टोकाला जाऊन पोहोचला आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल या हुकूमशाहीनुसार कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात अविश्वास ठरावही टाकण्यात येणार आहे. गेले काही दिवस हा संघर्ष सुरू आहे. या संघर्षाची ठिणगी गेल्या आठवड्यात पार पडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या समुपदेशन प्रक्रियेवेळी पडली. आंतरजिल्हा बदलीवरून हा संघर्ष सुरू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात बुधवारी नवीन भरती झालेल्या 428 शिक्षकांचे तसेच जिल्हा अंतर्गत बदलीतील पाचव्या व सहाव्यातील एकूण 261 शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया पार पडली. ही समुपदेशन प्रक्रिया पदाधिकार्यांनी बहिष्कार टाकल्याने गोंधळातच पार पडली. यामुळे ही प्रक्रिया संपायला दुसर्या दिवशी पहाटे 4 वाजले. इतका वेळ ही प्रक्रिया सुरूच होती. कामाला झोकून देण्याची पद्धत पाहून उमेदवारांना झोप ही सुखाने घेता आली नाही. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचार्यांच्या भरतीसाठी अनंत चतुर्दशीची सुट्टी असतानाही मुलाखती घेण्याचा खटाटोप जि. प. प्रशासनाने हाती घेतला. एकूण 45 जागांसाठी 144 जणांना बोलावण्यात आले होते. वास्तविक सुट्टी असतानाही एवढा अट्टहास का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. बरे एवढा अट्टहास करूनसुद्धा या मुलाखती उशिरा सुरू झाल्याने संपायला पहाटे 2.30 वाजले. यामुळे मुलाखतीस आलेल्या उमेदवारांना ताटकळत राहावे लागले. काही महिला उमेदवारांनी तर घरचा रस्ता पकडला. जि. प. प्रशासनाच्या या मनमानी कारभारावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. या दोन्ही प्रक्रिया पहाटेपर्यंत का सुरू ठेवल्या? याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. वास्तविक इतक्या उशिरापर्यंत या प्रक्रिया सुरू ठेवण्यापेक्षा मध्येच बंद करून दुसर्या दिवशी ही प्रक्रिया सुरू करता आली असती. मात्र जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने तसे केले नाही. एकंदरीत दोन प्रक्रियेत तरी जि. प.चा कारभार ‘रात्रीचा खेळ चाले…’ या पद्धतीचा असल्याचे दिसून येत आहे.
