गुहागर, चिपळूण मतदारसंघात उमेदवारीचे त्रांगडे कायम

0

चिपळूण : माजी आमदार भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशावरुन चिपळूण व गुहागर मतदारसंघात तिडा निर्माण झाला आहे. भाजप-सेना युती झाली तर गुहागर मतदारसंघ भाजपला दिल्यास जाधव यांना चिपळूण मिळणार का किंवा गुहागर मतदारसंघ भाजपकडेच राहिल्यास चिपळूणमधून सदानंद चव्हाण की भास्कर जाधव अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. नुकतेच जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे उत्तर रत्नागिरीच्या दौर्‍यावर आले. त्यांनी गुहागर, चिपळूण व खेड येथे सभा घेतल्या. गुहागरमधील सभेत आपण भास्कर जाधव यांच्या विजयी मेळाव्यालाच येऊ असे सांगितले. याचवेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीदेखील आता गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी येणार असे वक्‍तव्य केले. त्यामुळे शिवसेनेकडून जाधव यांना गुहागरची उमेदवारी जाहीर झाल्यासारखेच आहे. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हेच जाहीर भाषणात गुहागरमध्ये जाधव यांच्या विजयी मेळाव्याला येणार असे सांगून गेले आहेत. त्यामुळे एकप्रकारे गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने जाधव यांची उमेदवारी घोषीत केली आहे. दुसर्‍या बाजूला चिपळूण येथील मेळाव्यातही आदित्य ठाकरे यांनी आता सदानंद चव्हाण यांच्या विजयी मिरवणुकीलाच येईन असे जाहीर करुन टाकले आहे. त्यामुळे चिपळूण आणि गुहागरच्या दोन्ही जागा शिवसेनाच लढविणार असे या जनआशीर्वाद यात्रेतून स्पष्ट झाले आहे. दुसर्‍या बाजूला युतीचे त्रांगडे कायम असताना भास्कर जाधव यांना गुहागर की चिपळूण मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षे भाजपकडे होता. या आधीच्या निवडणुकीत तो युतीच्या वाटपामध्ये सेनेकडे आला. तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी त्यावेळी येथून निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव, श्रीधर सेनेचे अपक्ष उमेदवार डॉ. विनय नातू हे लढले. नातू यांचे भाजपशी संबंध दुरावले होते. त्यात सेना उमेदवाराचा पराभव झाला. त्या पुढील निवडणुकीत डॉ. नातू यांनी भाजपकडून ही जागा लढवली. त्यामुळे या निवडणुकीमध्ये डॉ. नातू यांनी गुहागर मतदारसंघावर भाजपचाच दावा सांगितला आहे. जिल्ह्यातील एकमेव जागा असल्याने भाजप गुहागरसाठी आग्रही आहे. मात्र, शिवसेना देखील भास्कर जाधव यांच्यासाठी गुहागर मतदारसंघ मागत असल्याने युतीच्या वाटाघाटीत गुहागर मतदारसंघाचे भवितव्य ठरणार आहे. गुहागर भाजपकडे गेला तर जाधव यांना चिपळूणमधून उमेदवारी देणार का आणि यामध्ये आ. सदानंद चव्हाण पत्ता कापणार काय असा सवाल उपस्थित होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here