खेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवारी रत्नागिरी येथे होणाऱ्या महाजनादेश यात्रेला येथील काँग्रेस तालुकाध्यक्ष गौस खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली काळे झेंडे दाखविण्यासाठी निघालेल्या १४ काँग्रेस पदाधिकारी कार्यकत्यांना येथील पोलिसांनी मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रोखून धरत येथील पोलीस स्थानकात आणले. खेड तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुकाअध्यक्ष गोस खतीब हे कोकणातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, पावसाळा कालावधीत व्यापारी, नागरिकांचे झालेली नुकसानभरपाई या शिवाय अनेक प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करून रत्नागिरी येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी निघाले होते. ही बाब पोलिसांना समजताच शहरातील गांधी चौक येथून पोलिसांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये तालुकाध्यक्ष गौस खतीब यांच्यासह अनिल सदरे, महमद काझी, बशिर मुजावर, दानिश्ता नाडकर, शराफत लोखंडे, बशीर मुजावर, कौसर मुजावर, कयुम नाडकर या १४ कार्यकत्यांचा समावेश आहे. सायंकाळी उशिरापर्यंत कार्यकर्ते येथील पोलीस स्थानकातच बसून असल्याचे सांगण्यात आले.
