महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भरावामुळे नदीच्या पत्राचा प्रवाह बदलला

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या कंत्राटदाराने आंजणारी (लांजा) येथील काजळी नदीच्या किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात माती, दगड यांचा भराव आणून टाकला आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह विरूद्ध बाजूच्या किनाऱ्याला वाढून तेथील घरांसह पुनसकोंड, कुणे रस्त्याखालील भरावाची धूप होऊन मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे महामार्गावरील आंजणारी नदीवरील पुलाच्या खांबांनाही धोका पोहोचण्याची शक्यता स्थानिकांनीव्यक्त केली आहे. या प्रकाराबाबत कुणे ग्रा. पं. हद्दीतील स्थानिक रहिवासी मनोहर कदम, बाब्या दाभोळकर यांनी माहिती देताना सांगितले की, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या ठेकेदार कंपनीने काही महिन्यांपूर्वी काम करताना माती, मोठे दगड, झाडांचे बुंधे यांचा भराव आणून आंजणारी पुलानजीक काजळी नदीच्या किनाऱ्यालगत निवसर रस्त्याच्या बाजूस टाकले आहेत. यामुळे नदीचा समतोल वाहणाऱ्या पात्राच्या प्रवाहात अडथळा येऊन, तो प्रवाह विरूद्ध बाजुच्या किनाऱ्यालगत होऊन, तेथील कुर्णे ग्रा.पं. हद्दीतील ५ घरांना पुराचा वारंवार धोका निर्माण होत आहे, तसेच किनाऱ्यालगतच्या पुनसकोंड-कुर्णे या दोन गावाच्या रस्त्याच्या खालील भरावाचा भागही धुपून जात असल्याने, तेथील ग्रामस्थ, विद्यार्थी जीव मुठीत घेऊन या उपलब्ध एकमेव मार्गाने प्रवास करीत आहेत. तसेच याचठिकाणी काजळी नदीवरील आंजणारी येथील महामार्गावरील मुख्य पुलाच्या खांबांनाही या भरावामुळे पात्र बदलून पाण्याचा वेग यांचा फटका बसून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याच्या अगोदर या घटनेकडे राष्ट्रीय महामार्ग विभाग, जिल्हा परिषद आणि तहसीलदार यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे,आंजणारी येथील काजळी नदीतील हा भराव पालीतील एका बेकरी, खाद्य उत्पादकाच्या येथील प्लॉटला हानी पोहचू नये, म्हणून त्याच्या सांगण्यावरून संबंधित कंत्राटदाराने नदीपात्रात टाकल्याची चर्चा परिसरात ग्रामस्थांमध्ये चर्चिली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here