नूर सुल्तान (कझाकिस्तान) : भारताची आघाडीची महिला पैलवान विनेश फोगाटला जपानची सध्याची जागतिक चॅम्पियन मायू मुकेदाकडून जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पराभूत व्हावे लागले. त्यामुळे जेतेपदाच्या शर्यतीतून ती बाहेर पडली, परंतु मुकेदा अंतिम फेरीत पोहोचल्याने रिपचेज राउंडमध्ये खेळून तिला कांस्यपदक मिळवण्याची संधी मिळाली आहे. पदकासोबत टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी देखील आशा कायम असतील. विनेश (53 किलो) या सत्रात तिला जपानी पैलवानाकडून सलग दुसर्यांदा पराभूत व्हावे लागले. यापूर्वी चीनमध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही दोन वेळा ती या खेळाडूकडून पराभूत झाली होती. विनेशने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. मात्र, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिला पदक जिंकता आलेले नाही. एक अन्य ऑलिम्पिक गटात सीमा बिसला (50 किलो) उपउपांत्यपूर्व फेरीत तीन वेळची ऑलिम्पिक पदक विजेता मारिया स्टॅडनिककडून 2-9 अशी पराभूत झाली. अझरबैझानची मल्ल उपांत्य फेरीत पोहोचल्याने सीमाच्या आशा कायम आहेत.बिगर ऑलिम्पिक गटात कोमल गोळेने तुर्कीच्या बेस्टी अलतुगविरुद्ध बचावात्मक खेळ केल्याने 72 किलो क्वालिफिकेशनमध्ये 1-4 अशी पराभूत झाली. तर, ललिताला 55 किलो गटात मंगोलियाच्या बोलोरतुया बात ओचिरने 3-10 असे सहज नमविले. विनेशला 53 किलो वजनीगटात कठीण ड्रॉ मिळाला होता. यापूर्वी तिने रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता सोफिया मॅटसनला 13-0 असे पराभूत केले; पण जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मायू मुकेदाविरुद्ध विनेशला आक्रमक खेळ करता आला नाही. त्यामुळे ती 0-7 अशी पराभूत झाली.
