मीराबाई चानूचे लक्ष ऑलिम्पिक कोटा मिळण्याकडे

0

पट्टाया : माजी चॅम्पियन मीराबाई चानू बुधवारपासून सुरू होणार्‍या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. आपल्या 2017 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासोबत ऑलिम्पिक कोटा मिळण्याकडे देखील तिचे लक्ष असेल. जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद 2017 सालच्या स्पर्धेत 48 किलो वजनीगटात सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे यावेळी देखील ती पदकासाठी प्रबळ दावेदार आहे. मीराबाईने 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर पाठीच्या दुखापतीमुळे जवळपास नऊ महिने बाहेर राहिल्यानंतर जोरदार पुनरागमन केले आहे. आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाने (आईडब्ल्यूएफ) वजनवर्गात बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 48 किलोऐवजी ती 49 किलो वजनीगटात सहभागी होणार आहे. 25 मीराबाईने यावर्षी तीन स्पर्धेत सहभाग नोंदवत आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. मीराबाईने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी केली; पण तिला पदक मिळवता आले नाही. गेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत थायलंडच्या चायुत्रा प्रमोंगखोलने महिलांच्या 49 किलो वजनीगटात 209 किलो (89 आणि 120 किलो) वजन उचलत सुवर्ण कामगिरी केली. मात्र, ती डोपिंग प्रकरणात अडकली आहे. याशिवाय चीनची सध्याची विश्वविक्रम नावे असलेली हाऊ झिझुईने 208 किलो सोबत रौप्य तर, चीनच्याच जियांग हुइहुआने 206 किलो वजनासह कांस्यपदक मिळवले आहे. मीराबाईला झिझुई व हुइहुआ दोघांचे आव्हान असेल. मी सरावात 203 किलो वजन उचलले आहे. माझे लक्ष 210 किलो आहे. टोकियोपर्यंत मी एवढे वजन उचलण्यात यशस्वी होईल, अशी आशा असल्याचे मीराबाई म्हणाली. महिला गटात झिली दलबेहरा (45 किलो), स्नेहा सोरेन (55 किलो) व राखी हलधर (64 किलो) भारताचे प्रतिनिधित्व करतील. पुरुष गटात युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता जेरेमी लालरिननुंगा याच्यावर असणार आहेत. मिझोरमच्या 16 वर्षीय खेळाडूने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 297 किलो (134 व 163 किलो) वजन उचलत युवा जागतिक व आशियाई विक्रमाची नोंद केली होती; पण जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवण्याची त्याला फारशी संधी नाही. कारण सुरुवातीचे वजन 305 किलो ठेवल्याने त्याला ‘ब’ गटात ठेवण्यात आले आहे.गेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत स्पर्धकांनी 332, 323 आणि 322 किलो वजन उचलत अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक मिळवले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here