खेड : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून तयार करण्यात आलेल्या वेरळ-भोस्ते-शिव-बोरज या रस्त्यावर पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी आणि सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दर्जा वाढीसाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ग्रामविकास विभागामार्फत राबविण्याचा निर्णय भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर घेण्यात आला. या योजनेत पहिल्या टप्प्यात वेरळ-भोस्ते-निळीक-शिवबोरज या सुमारे १४ कि.मी. रस्त्याचे काम अंतर्भूत करण्यात आले होते. या रस्त्याचे भूमिपूजन सन २०१७ मध्ये पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याहस्ते झाले.८ मार्च २०१७ पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली. या रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ते रखडले. यावर्षी मे महिना अखेरिस हे काम पूर्ण करून घेण्यात आले. मुंबईगोवा महामार्गापासून सुरू होणाऱ्या या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर असलेल्या ९ कोटी ५५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. रस्त्याच्या कामाच्या प्रारंभापासून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. निळीकचे सरपंच रहिमान चौगुले यांनी डिसेंबर २०१८ मध्ये निवेदनाद्वारे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पालकमंत्र्यांकडे तक्रारही केली होती. खेड रेल्वे स्थानकाजवळ महामार्गावरून या रस्त्याची सुरुवात होते. या रस्त्यावर भोस्ते विराचीवाडी पर्यंत फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून वाहने हाकताना वाहनचालकांना कसरत करावी लागते तर पादचाऱ्यांना वाहनांचे उडणारे पाणी चुकवत रस्त्यावरून चालावे लागत आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यानेच पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खेड शहर ते रेल्वे स्थानक या दरम्यान मोठ्या प्रमाणात चारचाकी व रिक्षा वाहतूक सुरू असते. रस्त्यातील खड्डे चुकवताना छोट्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
