चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा दि.२० सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या निमित्त दापोली, गुहागर व चिपळूण येथे जाहीर सभा होणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,खा. डॉ. अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा होणार आहेत. याबाबत तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी मंगळवारी (दि.१७) सकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस शेखर निकम, विधानसभा क्षेत्रप्रमुख दादा साळवी, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शोकत मुकादम, शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, युवकचे जिल्हाध्यक्ष डॉ. राकेश चाळके, राजू जाधव आदी उपस्थित होते. शिवस्वराज्य यात्रेसाठी खा. सुनील तटकरे, आ.संजय कदम, प्रवक्ते अमोल मेटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही यात्रा गुहागर येथील सभेनंतर शहरातील उक्ताडपासून सुरू होईल. उक्ताड, रंगोबा साबळे मार्गे भव्य रॅली काढण्यात येईल. या दरम्यान चिपळूण न.प.समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. या रॅलीत पाचशेहून अधिक दुचाकीस्वार सहभागी होतील. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणात सायंकाळी ४ वा.सभा होईल, असे खताते यांनी सांगितले.चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्ह्यात सेना, भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे. त्या तुलनेत चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात सुरू आहे. त्यामुळे या यात्रेला चिपळुणात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
