टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान

0

कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ५ बाद ३०२ धावा केल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियाला ५० षटकात विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान दिले आहे. भारताच्या मधल्या फळीला मोठ्या धावा करण्यात अपयश आल्यानंतर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाने संघाच्या फलंदाजीची जबाबदारी खांद्यावर घेतली. या दोघांनी एकेरी, दुहेरी धावांवर भर देताना काही आक्रमक फटकेही खेळले. पंड्याने ४४ व्या षटकात ५६ चेंडूत त्याचे या वनडे मालितेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने अनेक आक्रमक फटकेबाजी केली. त्याला जडेजाचीही शानदार साथ मिळाली. जडेजानेही चौकार – षटकारांची बरसात करत ४८ व्या षटकात ४३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी मिळून नाबाद दीडशतकी भागीदारी रचली. त्यामुळे भारताला ३०० धावांचा टप्पा पार करता आला. जडेजाने ५० चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ६६ धावा केल्या. तर पंड्याने ७६ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारांच्या मदतीने नाबाद ९२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऍश्टन एगरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच ऍडम झम्पा, सीन ऍबॉट आणि जॉस हेझलवूडने प्रत्येकी १ विकेट घेतली.

भारताची मधली फळी कोलमडली

भारतीय संघाने २८ षटकांच्या आत श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या विकेट्स झटपट गमावल्यानंतर विराट कोहलीने हार्दिकला साथीला घेत संघाचा डाव पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण अर्धशतक पूर्ण केल्यानंतर ३१ व्या षटकात विराटने ६३ धावांवर असताना विकेट गमावली. त्याला जॉस हेझलवूडने यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरीकरवी झेलबाद केले. सुरुवातीला पंचांनी त्याला नाबाद दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने डीआरएस रिव्ह्यूचा वापर केला. त्यामुळे त्यात विराट बाद असल्याचे दिसले. विराट बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाने संयमाने डाव पुढे नेला. या दोघांनी ३५ व्या षटकापर्यंत भारताला १६० धावांचा टप्पा पार करुन दिला. तसेच काही आक्रमक फटकेही पंड्याने खेळले. त्यामुळे भारताने मधल्या फळीती विकेट्स गमावल्यानंतर ४० षटकात ५ बाद १९२ धावा केल्या.

विराट कोहलीचे अर्धशतक –

या सामन्यासाठी सलामीवीर म्हणून संधी मिळालेल्या शुभमन गिलने काही चांगले फटके खेळले. मात्र विराटसह दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचल्यानंतर १६ व्या षटकात ऍश्टन एगरने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर तो पायचित बाद झाला. यावेळी त्याने डीआरएस रिव्ह्यू देखील घेतला. मात्र हा रिव्ह्यूमध्ये अंपायर डिसिजन असा निर्णय आल्याने गिलला विकेट गमवावी लागली. त्याने ३९ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह ३३ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी आला. त्याने विराटला चांगली साथ द्यायला सुरुवात केली होती. विराटने २३ व्या षटकात ४० धावांचा आकडा पार केला. पण त्याचवेळी या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ऍडम झम्पाने अय्यरला १९ धावांवर असताना बाद केले. अय्यर बाद झाल्यानंतर केएल राहुल विराटला साथ देण्यासाठी आला. मात्र तो देखील खास कामगिरी करु शकला नाही. तो २६ व्या षटकात ५ धावांवर पायचित झाला. त्याल एगरने पायचित केले. त्याने डीआरएस रिव्ह्यू घेतला. पण हा रिव्ह्यू त्याच्या विरोधात गेला. त्यामुळे २६ षटकांच्या आतच भारताला ४ विकेट्स गमवाव्या लागल्या. केएल राहुल बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी आला. विराटने ६४ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. यावेळी त्याने चार चौकार मारले. हे त्याचे ६० वे वनडे अर्धशतक आहे. त्यामुळे भारताने २८ षटकात ४ बाद १३३ धावा केल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:52 PM 02-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here