मिरजोळे येथे पुन्हा भूस्खलन

0

रत्नागिरी : तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे शहरानजीकच्या मिरजोळे मधलीवाडी-खालचापाट येथे भूस्खलन झाले आहे. गेली पंधरा वर्षे भूस्खलनाचा प्रकार सुरू असूनही त्यावर उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे. जमिनीला भेगा पडून ती खचत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. राहिलेली शेतीही भूस्खलनात जाते की काय, अशी भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. शहरालगत असणार्‍या मिरजोळे मधलीवाडीतील नदीलगत असणार्‍या खालचा पाट भागात हा प्रकार सन 2006 पासून सुरू आहे. गतवर्षीही याच ठिकाणी भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात जमीन खचली होती. या वर्षीही दोन दिवस पडणार्‍या जोरदार पावसामुळे शेतजमीन खचू लागली आहे. लावलेल्या शेतात मधोमध भेगा पडून ती खचत असल्याने या भागात जाण्यास शेतकरीही आता घाबरत आहेत.जमिनीला भेगा पडून मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असून शेत मळ्यांमध्ये मधल्याच भागात तडे जात असल्याने येथील सुमारे 17 एकरांहून जास्त शेती संकटात आली आहे. गेल्या पंधरा वर्षात यावर कोणताच ठोस उपाय काढण्यात आलेला नाही. काही वर्षांपूर्वी  अधिकार्‍यांनी पाहणी करुन येथील जमिनीला तडा जाण्याच्या या प्रकाराची भौैगोलिक तज्ज्ञांकडून पाहणीही केली होती. परिघाकृती भूस्खलनाचा हा प्रकार त्यावेळी नमूद करताना झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला होता. त्यावर उपाययोजनाही सुचविण्यात आली होती. त्या नंतरही  सातत्याने पाठपुरावा करून यावर उपाय करताना काँक्रिटचा धूपप्रतिबंधक  बंधारा आणि नदीवर छोटा बंधारा (धरण) बांधण्यात आले. त्यावर सुमारे 15 ते 20 लाख खर्च झाले. गतवर्षी जमीन खचली त्यावेळी जिल्हाधिकारी पी. प्रदीप यांनीही भेट देऊन या भागाची पाहणी केली होती. त्यावेळीही पुन्हा उपाययोजना करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. मात्र, अद्याप यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही. दोन दिवस पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जमीन खचू लागली आहे. शेतीमध्ये सुमारे शंभर फूट लांबीची व अर्धा ते दीड फूट रुंदीची भेग पडली आहे. सुमारे 15 ते 20 फूट खोल भेग असून त्याबाजून शेतजमीन खचू लागली आहे.  या भागात जमीन खचत असल्याने ऐन खरिपाच्या हंगामात लागवड केलेल्या शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे काही एकर शेतजमीन नष्ट होण्याची भीती आहे. सन 2006मध्ये झालेल्या भूस्खलनावेळी सुमारे 45 एकर जमीन खचून शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते.  सातत्याने भूस्खलन होत असल्याने नदीशेजारील डोंगरावर असणारी ही शेतीच नष्ट होण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्‍त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here