नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. ई सिगारेटचे उत्पादन, आयात/निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण आणि जाहिरात करणे अशा सर्व बाबींवर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिली. त्याचबरोबर रेल्वेच्या कर्मचार्यांना चालूवर्षी 78 दिवसांच्या कामाइतका बोनस देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. रेल्वेच्या सुमारे 11 लाख 52 हजार कर्मचार्यांना या बोनसचा फायदा होणार असून सलग सहाव्या वर्षी रेल्वे कर्मचार्यांना बोनस दिला जाणार आहे. बोनसपोटी रेल्वे मंत्रालयाला 2 हजार 24 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार असल्याची माहिती जावडेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली.
