चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या अपंग पुनर्वसन योजनेअंतर्गत दि. १८ रोजी २४ लाख ६५ हजार रूपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. यावेळी ७१ अपंगांना अनुदान वाटप होणार आहे अशी माहिती नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी दिली. अपंगव्यक्तींनास्वत:च्यापायावर उभे राहता यावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील पाच टक्के निधी देण्याची तरतूद आहे. या निधीतून त्यांचे पुनर्वसन केले जाते. हा निधी खर्च करणे न.प.ला बंधनकारक असते. चिपळूण न.प.ने मागील दोन वर्षे हा उपक्रम राबविला आहे. चिपळूण शहरात एकूण २२५ अपंग व्यक्ती आढळल्या असून यातील ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. पहिल्या टप्प्यात ४८ लाभार्थ्यांना २८ लाख ९७७ रूपयांचे अनुदान वितरित झाले. या माध्यमातून त्यांना आधार मिळाला. दुसऱ्या टप्प्यात ७१ लोकांना हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. यातून घरघंटी, शिलाई मशिन, झेरॉक्स मशिन, लॅपटॉप, दुचाकी, संगणक आदी साहित्य देण्यात येणार आहे.
