धरणांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची व्यवस्थाच नाही

0

रत्नागिरी : धरणांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची तैनाती आवश्यक असते. परंतु, कोकणातील पाटबंधारे धरण प्रकल्पांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था नाही, असे कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष विक्रांत आंब्रे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. सोमवारी त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरण प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. औरंगाबाद येथे धरणांच्या सुरक्षिततेवर निगराणी ठेवण्यासाठी तब्बल १५० सुरक्षा रक्षक कार्यरत आहे. परंतु, ज्या कोकणात सर्वाधिक पाऊस कोसळतो तेथील धरणांवर एकही सुरक्षा रक्षक नाही. आता प्रत्येक प्रकल्पाला भेट देऊन अशा सुरक्षिततेबाबत अहवाल बनवून सुरक्षिततेचा पुरवठा होण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचेही उपाध्यक्ष आंब्रे यांनी यावेळी सांगितले. एसआयटीकडून १३ प्रकल्पांची चौकशी सुरू आहे. त्यात चिपळुणातील तिवरे धरणाचाही समावेश आहे. त्यामुळे या धरण दुर्घटनेसंदर्भात काहीही बोलणे योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले. या दुर्घटनेला आताच अधिकारी जबाबदार असल्याचे म्हणणे धाडसाचे ठरेल. एसआयटीचा अहवाल येईपर्यंत योग्य ठरेल, असेही ते म्हणाले. कोकणातील सिंचनावर खर्च मोठ्या प्रमाणात होतो परंतु, शेतकऱ्याला पाणी मिळत नाही. शेतकरीही वाशिष्ठीचे पाणी उचलून घेऊन शेती करू, असे म्हणत नाही. त्यामुळे हेच पाणी दुसरीकडे जाण्यास वाव मिळाला आहे. मराठवाड्यात आंघोळीपुरतेही पाणी मिळत नाही. अशावेळी येथील शेतकरी राजी झाल्यास कोयनेचे अवजल पाईपलाईनद्वारे मराठवाड्यास देण्यास हरकत नाही. सह्याद्रीच्या कुशीतून जाणाऱ्या याच पाण्याच्या पाईपलाईनवरुन स्थानिकांनी पाण्याची मागणी केल्यास त्यांना ते मिळू शकेल, असा विश्वासही महामंडळाचे उपाध्यक्ष विक्रांत आंब्रे यांनी व्यक्त केला.
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here