हे तीन नव्हे तर चारचाकी सरकार; चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार तीन चाकांचे असल्याची टीका विरोधक करताहेत, पण आमचे सरकार तीन चाकांचे नव्हे तर चार चाकांचे आहे. चौथे चाक हे जनतेच्या विश्वासाचे आणि आशीर्वादाचे आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करताना या विश्वासाच्या बळावरच हा जगन्नाथाचा, जनता जनार्दनाचा रथ मजबुतीने पुढे नेणारच, असा जबरदस्त विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, थांबला नाही आणि थांबणारही नाही. या संकटांचा मुकाबला तर करूच पण राजकीय संकटे कुणी आणण्याचा प्रयत्न केला तर ती तोडूनमोडून महाराष्ट्र पुढे नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच त्यांनी यावेळी विरोधकांना दिला. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सहय़ाद्री अतिथी गृह येथे ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या एक वर्षाच्या कालावधीचा लेखाजोखा मांडतानाच ऐन कोरोना काळात राजकारण करणाऱ्य़ा विरोधकांचा समाचारही घेतला.

टीममधले सगळे खेळाडू अनुभवी
क्रिकेट पाहणे वेगळे आणि मैदानात टोलेबाजी करणे हे वेगळे. पॅव्हेलियनमधल्या एखाद्याला सांगायचे तू हो पॅप्टन आणि उतर मैदानावर. पण अशी टोलेबाजी करताना टीमसुद्धा महत्त्वाची असते. या टीममध्ये सगळेच खेळाडू अनुभवी आहेत. तीनही पक्ष आणि अपक्ष असे वेगवेगळय़ा विचारांचे लोक आहेत. पण सर्वच जण खूपच छान करत आहेत. एकमेकांना सहकार्य करीत आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

मला फोन टॅपिंग करायची गरज नाही
मी घराबाहेर पडत नाही अशी टीका माझ्यावर करतात. माझे सर्व सहकारी घराबाहेर फिरतायेत म्हणून मी निश्चिंत आहे. त्यांच्यावर माझा विश्वास आहे. मला कुणाचेही फोन टॅपिंग करायची गरज नाही. सहकारी म्हणायचे आणि त्यांचे फोन टॅपिंग करायचे, असले धंदे मी करीत नाही, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला.

हे सरकार पुढची 25 काय अनेक वर्षे चालेल! : शरद पवार
महाराष्ट्रात कधी नव्हे असा प्रयोग झाला. अनेकांनी शंका उपस्थित केली होती. ही शंका कधी नव्हे ते हाती आलेले सरकार गेले यातून होती. सत्तेचा कोणताही अनुभव नसताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. पण मुख्यमंत्री अबोल असले तरी ते चतुर आहेत. त्यामुळे तीन वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारने यशस्वीपणाने एक वर्षाची कारकीर्द पूर्ण केली. या सरकारवर जनतेचा विश्वास आहे. आणि एकदा विश्वास टाकला की जनता कधी विसरत नाही. त्यामुळे पाच वर्षाचा कद्रूपणा कशाला दाखवता, हे सरकार पुढची पंचवीसच काय तर अनेक वर्षे चालेल, असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केला. शरद पवार म्हणाले, बघता बघता एक वर्षे निघून गेले. एका वर्षात अनेक प्रकारची संकटे आली आणि त्या संकटावर मात करून हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्याची कामगिरी या सरकारने केली आहे. त्याचे दर्शन माहिती व जनसंपर्प संचालनालयाने काढलेल्या पुस्तिकेतून होत आहे.

संकटे येऊनही आंदोलने झाली नाहीत, हा चमत्कार या सरकारने केला!
सरकारला एक वर्षे पूर्ण झाले आणि त्याच्या कामगिरीची एवढी चिकित्सा झाल्याचा प्रकार मी मागील पन्नास वर्षात कधी पाहिला नाही. अनेक वृत्तपत्रांतून झालेली चिकित्सा यामागे हे सरकार चालेल की नाही याबाबत उपस्थित केल्या गेलेल्या शंकांमध्ये आहे. अशी उपस्थित करण्याची वेळ त्यांच्यावर कधी नव्हे ते हाती आलेले सरकार गेल्याच्या अस्वस्थतेमुळे त्यांच्यावर आली, पण संकाटाची मालिका सुरू असतानाही हे सरकार टिकले. शेती, शेतकरी संकटात होता. या सरकारमधील प्रत्येक प्रतिनिधींनी समर्थपणे जबाबदारी सांभाळली, हाताळली. या संकटातसुद्धश संकटग्रस्तांचा आत्मविश्वास वाढला अशी स्थिती आपल्याला बघायला मिळाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या सहकाऱ्य़ांनी जे कष्ट घेतले. याची नोंद घेऊन हा बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही की उपोषण केले नाही. हा चमत्कार या सरकारने करून दाखवला, अशी शाबासकीची थाप शरद पवार यांनी महाविकास सरकारच्या पाठीवर दिली.

अशा प्रकारे सरकार चालवण्याचा हा पहिलाच प्रयोग
विविध प्रयोग करुन झालेलं सरकार हे महाराष्ट्राने तीनवेळा पाहिली. सर्वात पहिली जबाबदारी माझ्यावर होती. 1978 मध्ये झालेला तो प्रयोग हा तसा सोपा राजकीय प्रयोग होता. कारण त्यातले मोजके लोक होते की ज्यांना प्रशासनाचा अनुभव होता. त्यामुळे राज्याच्या प्रमुखांकडून त्यांच्या फार अपेक्षा नव्हत्या. ते अत्यंत संतुष्ट असायचे, त्यामुळे ते राज्य चालवणं तितकंसं कठीण नव्हतं. नंतरच्या काळात आणखी एक सरकार येऊन गेलं. मात्र त्या सरकारच्या मागे बाळासाहेब ठाकरेंसारखं खंबीर नेतृत्त्व ठामपणे उभं होतं म्हणून ते सरकार चाललं. त्यांनी मार्गदर्शक म्हणून उत्तम काम केलं त्यामुळे त्या सरकारलाही कोणतीही अडचण आली नाही. आता प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खूप चांगलं नेतृत्त्व केलं. खरंतर मुख्यमंत्र्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. महाविकास आघाडीचा प्रयोग जेव्हा झाला तेव्हा त्यांना हे सगळं कसं जमेल अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. मात्र त्यांना प्रशासकीय अनुभव नसला तरीही त्यांच्या चातुर्यात काहीही कमतरता नाही, अशी कौतुकाची थाप शरद पवार यांनी दिली.

केंद्र सरकारचे शेतकऱ्य़ांच्या प्रश्नांकडे लक्ष नाही
आज आपण बघतो आहोत की संपूर्ण देशातील शेतकऱ्य़ांमधला असंतोष दिसून आला. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा येथील शेतकरी आठ दहा दिवसांपासून रस्त्यावर उपोषणाला बसला आहे. केंद्रातील राज्यकर्त्यांनी त्यांच्या प्रश्नांकडे हवे ते त्या पद्धतीने लक्ष दिलेले नाही. याचा असंतोष देशाबाहेर सुद्धा बघायला मिळतोय. कॅनडासारख्या देशाच्या पंतप्रधानांनी याची दखल घेतली. देशाच्या राजधानीत हे चित्र बघायला मिळतेय अशी खंत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

जनतेने जगन्नाथाचा रथपुढे नेण्यासाठी हातभार लावला
लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योग बंद पडले. महाराष्ट्र उद्योगधंद्याचे राज्य आहे. उद्योगाचे महत्त्वाचे राज्य बंद झाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेकडे विपरित परिणाम होणार, याची काळजी राष्ट्रप्रमुखांना होती. परंतु कारखाने कशी चालू राहतील. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात मागे राहणार नाही ही दक्षता या सरकारमधील तसेच उद्योग क्षेत्रातील सर्व सहकाऱ्य़ांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व केले. सर्वांना त्यांनी सोबत घेतले. तरीही या सरकारमध्ये लोकांचा सहभाग होता. आपण भाग्यवान आहोत महाराष्ट्राच्या जनेतेने संकटकाळात हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी हातभर लागला. म्हणून आज आपण यशस्वी ठरलो आहोत, असे सांगून शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले.

या सरकारमध्ये नव्या उमेदीचे सहकारी आहेत. तर अनेक सहकारी अनेक वर्षे सत्तेत गाढा प्रशासनाची अनुभव असलेले आहेत. एका बाजूला नवी उमेद तर एका बाजूला प्रदीर्घ अनुभव या दोघांचे समन्वयाने य सरकार यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.

कोरोनाकाळात विकासकामांना खीळ बसणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
जनतेच्या विकासासाठी हे सरकार बांधील आहे. या शासनाची वर्षपूर्ती ही समर्थ महाराष्ट्राला घडविणाऱ्य़ा निर्धाराची असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जनता आणि प्रशासन यांच्यात संघभावना निर्माण करण्याचे काम केल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना योद्धय़ांचे आभार मानत कोरोना काळात विकासकामांना खीळ बसणार नाही याची ग्वाहीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. साडेचार लाख कोटींचा आपला अर्थसंकल्प. सगळे तीन लाख कोटीत बसविण्याची वेळ आली. पण आम्ही डगमगलो नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच सहकाऱ्य़ांच्या मदतीने याला तोंड दिले. केंद्राने अद्यापही जीएसटीचे 28 हजार कोटी दिले नाहीत. पण सगळयातून मार्ग काढला.जनतेसाठी आवश्यक निधीला कधी कमतरता भासू दिली नाही.गेले वर्षभर विरोधक अफवा उठवत राहिले.हे सरकार आता पडणार आणि मग पडणार अशी गाजरे दाखवत राहिले.पण मुख्यमंत्री उदधव ठाकरे,शरद पवार आणि सोनिया गांधी हे तिन्ही नेते भक्कमपणे सोबत आहेत या सरकारला त्यामुळे कसलाही धोका नाही असेही अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री डॉक्टर झाले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोगयमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळात अतिशय मन लावून काम केले.या दोघांचा आता यावर इतका अभ्यास झाला आहे की ते दोघेही अर्धे डॉक्टरच झाले आहेत. म्हणून आम्हा सगळयांना कोरोना झाला पण त्या दोघांजवळ अद्याप कोरोनाला फिरकायची हिंमत झाली नाही अशी मिश्कील टीपणी अजित पवार यांनी यावेळी केली.

नागरिकांना विविध उपाययोजनांनी दिलासा
महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करीत असून अतिवृष्टी, चक्रीवादळ कोरोना याकाळात नागरिकांना विविध उपाययोजनांनी दिलासा देण्याचे काम केले आहे. गेल्यावर्षी शिवतीर्थावर झालेला शपथविधी सोहळा ऐतिहासिक क्षण असल्याचा उल्लेख महसूलमंत्री थोरात यांनी केला. यावेळी त्यांनी राज्य शासनाने वर्षभरात शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी आदी घटकांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

तर शिवाजी पार्कचे मैदान कमी पडले असते
कोरोनामुळे आज हा छोटेखानी सभागृहात हा कार्यक्रम पार पाडावा लागत आहे. नाहीतर एक वर्षापूर्वी 28 नोव्हेंबर रोजी ओसंडून वाहणाऱ्य़ा गर्दीत ज्या शिवतीर्थावर या सरकारच्या शपथविधीचा सोहळा पार पडला. त्या ठिकाणीच हा वर्षपूर्तीचा सोहळा पार पडला असता आणि शिवाजी पार्कचे मैदानही या सोहळ्यासाठी कमी पडले असते, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेला कुठेही काही कमी पडू दिले नाही. या सरकारच्या पाठीशी जनता आहे. आणि पाच वर्षांचा कालखंड पूर्ण करण्यासाठी जनतेने जो विश्वास दाखवला आहे तो कायम राहील, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:15 PM 04-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here