येत्या काही दिवसांत देशातील काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, निवडणुकांच्या वेळी राजकीय पक्षांनी प्लास्टिकचा वापर टाळावा.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, काही राजकीय पक्षांनी मतपत्रिकेद्वारे मतदानाबद्दल चर्चा केली. परंतु आता बॅलेट पेपर्सच्या माध्यमातून निवडणुका घेणे शक्य नाही, तो आता इतिहास आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) छेडछाड करता येणार नाही. ईव्हीएम खराब होऊ शकतात, परंतु त्यात छेडछाड केली जाऊ शकत नाही.
बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल सांगितले की, काही राजकीय पक्षांनी दिवाळीनंतर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. तथापि, या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत.
