रत्नागिरी : कोकणच्या पर्यटनासाठी मुंबई-गोवा महामार्ग हा ‘लाईफलाईन’ ठरणार आहे. सिंधुदुर्गप्रमाणेच लवकरच रत्नागिरी जिल्ह्यालाही पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. युती शासनाच्या कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात कोट्यवधीची विकासकामे झाली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधूनच 1639 किलोमीटरचे रस्ते जिल्ह्यात झाल्याचेही त्यांनी सांगितले. मंगळवारी रात्री 9 वा. 22 मिनिटांनी मुख्यमंत्री रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मेळाव्यास्थळी दाखल झाले. त्यानंतर अर्धातास त्यांनी विरोधकांसह मागील पाच वर्षात केंद्र व राज्य शासनाने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांच्यासह उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, यात्राप्रमुख तथा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नरेंद्र पवार, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी आमदार डॉ. विनय नातू, बाळ माने, मुंबई म्हाडा सभापती मधू चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हा भाजपच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन व पदाधिकार्यांनी पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाजपला यात्रेची परंपरा आहे. विरोधात असताना संघर्ष यात्रा काढण्यात आली. आज सत्तेत असल्याने जनतेशी संवाद साधण्यासाठी व जनताजनार्दनाचा आशीर्वाद घेण्यासाठी ही जनादेश यात्रा आहे. गेली पंधरा वर्षे सत्ता भोगल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीची मुजोरी वाढली होती. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पुढील 25 वर्षात सत्तेची संधी त्यांना मिळणार नाही हे विरोधकांना कळून चुकले आहे. त्यामुळे ते ईव्हीएम मशीनला दोष देत आहेत, असे ना. फडणवीस म्हणाले. राज्यातील जनतेचे भाजपासह मुख्यमंत्र्यांवर असलेले प्रेम आज दिसून आले. सभेला चार तास उशीर झाला तरीही मैदान भरलेले आहे. विरोधकांच्या सभेला मंगल कार्यालयेही भरत नाहीत. स्वा. वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणार्यांना हे काँग्रेस, राष्ट्रवादीवाले पाठीशी घालतात. राज्यातील जनतेचे दुःख अजूनही संपलेले नाही. बेरोजगारी अजूनही कायम आहे. ती दूर करण्यासाठी उद्योग आणून बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिंचन, रस्ते, रेल्वे मार्ग यांची निर्मिती केली जात आहे. शेतकर्यांना 50 हजार कोटींची मदत करून त्यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे गेल्या पाच वर्षात कोकणालाही सरकारने भरभरून दिले. गोवा-मुंबईला जोडणार्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पावसाळ्यानंतर या कामाला वेग येईल. मिर्या-नागपूर महामार्गही पूर्ण करून रत्नागिरीशी अधिक गतीने पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जाणार असल्याचे ना. फडणवीस यांनी सांगितले. रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे 917 हेक्टर क्षेत्रावर नवीन औद्योगिक वसाहत उभारून त्याद्वारे दोन हजारहून अधिक रोजगार निर्मिती केली जाणार असल्याचे ना. फडणवीस यांनी जाहीर केले. नजीकच्याच जयगड बंदरात सहा हजार कोटीची गुंतवणूक होत आहे. जयगड-डिंगणी रेल्वे मार्ग होत आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध होणार असल्याचेही ना. फडणवीस यांनी सांगितले. रत्नागिरी शहरामध्येही अनेक कोटींची विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी युती सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जेटींच्या विकासासाठी 84 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील अनेक जेटींचा समावेश आहे. मिरकरवाडा बंदरासाठी 75 कोटींचा निधी देण्यात आला आहे. मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने नव्याने मत्स्य मंत्रालयाची स्थापना केली आहे. उडान -तीनच्या टप्प्यांतर्गत रत्नागिरीमधून विमान उड्डान होईल. त्याचा फायदा पर्यटनालाही होणार असल्याचे ना. फडणवीस यांनी सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, अॅड. बाबासाहेब परूळेकर, अॅड. विलास पाटणे, चिपळूण नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, देवरूख नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, चिपळूण तालुकाध्यक्ष सतीश मोरे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये या यात्रेने उत्साह संचारला आहे.
