कणकवली : खा. नारायण राणे यांनीही नाणार प्रकल्प समजून घ्यावा. नाणार प्रश्नावर त्यांनी प्रथम आपली भूमिका जाहीर करावी आणि मगच भाजपमध्ये येण्याचा विचार करावा. भाजपची उमेदवारी गल्लीत नव्हे तर दिल्लीत जाहीर होते. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जो उमेदवार देतील तोच भाजपचा कणकवलीतील अधिकृत उमेदवार असेल, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितले. राणे यांनी मंगळवारी भाजप प्रवेशाची जी घोषणा केली त्यावर मुख्यमंत्र्यांशी रत्नागिरी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्यांनी चर्चा केली असता राणे यांच्या प्रवेशाबाबत मी नाही तर कोअर कमिटी निर्णय घेणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचेही जठार म्हणाले. कणकवलीतील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आ.राजन तेली, अतुल रावराणे, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल, मालवण तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, रमेश पावसकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कणकवलीत स्वागत केल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमानचे संस्थापक खा.नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना लवकरच आपला मुंबईत भाजप प्रवेश होईल. कणकवली मतदारसंघातून आ. नीतेश राणे हेच भाजपचे उमेदवार असतील असे वक्तव्य केले होते. खा.राणेंच्या या वक्तव्यावर प्रमोद जठार यांनी भूमिका मांडली. राणेंना भाजपमध्ये यायचे आहे तर त्यांनी आधी नाणार प्रकल्प मंजूर आहे का? हे सांगायला हवे. त्यांना नाणार प्रकल्प मंजूर असेल, त्यांना भाजपची ध्येयधोरणे पटत असतील तर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल असे जठार म्हणाले. युती होणार की नाही? हे माहित नाही मात्र नाणार नक्की होईल असेही ते म्हणाले. प्रमोद जठार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला सिंधुदुर्गवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि यंत्रणेचे आपण आभार मानतो. फोंडाघाटपासून कणकवली आणि कणकवलीपासून रत्नागिरीपर्यंत मुख्यमंत्र्यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. लोकांची प्रचंड उपस्थिती हाच या यात्रेला मिळालेला महाजनादेश आहे. कोकण पर्यटन विकास समितीला 1 हजार कोटीची तरतुद करण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आ.प्रवीण दरेकर यांनी कोकणातील सहा जिल्ह्यात पर्यटक निवास न्याहरी योजनेकरिता मुंबई बँकेकडून 500 कोटींची आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. यातून 5 हजार महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोकणात पर्यटन विकासाची ही योजना राबविली जाणार आहे. कोकणच्या पर्यटन विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे जठार म्हणाले. नाणार प्रकल्पाचा फेरविचार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत प्रमोद जठार म्हणाले, राजापूरमध्ये नाणार प्रकल्प समर्थक असलेल्या हजारो लोकांनी मुख्यमंत्र्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. एक लाख रोजगार निर्मिती करणारा हा प्रकल्प आहे. बेरोजगारीची खरी भूक या उपस्थितीवरून दिसून आली. नाणार प्रकल्प समर्थनासाठीच ही उपस्थिती होती. या प्रकल्पाला असलेले प्रचंड समर्थन पाहून मुख्यमंत्र्यांनी येत्या निवडणुकीनंतर हा प्रकल्प होण्याबाबत चर्चा केली जाईल, असे सांगत या प्रकल्पाचा फेरविचार करण्याचे संकेत दिले. नाणार प्रकल्प जर स्थानिकांना हवा असेल तर आमचा विरोध नाही, या आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल जठार यांनी ठाकरेंचे कौतुक केले. त्याचबरोबर आरेचा विषयही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून समजून घ्यावा, मग तेही समर्थन करतील, असे जठार म्हणाले.
